वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते ग्रामपंचायतचे वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन करण्यात आले.
. ग्राम विकासाचे विविध अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी खेमजई ग्रामपंचायतीचा नावलौकिक आहे. गेल्या ४ वर्षापासून ग्रामपंचायतीचे पुढाकाराने गावातील प्रत्येक कुटुंबाला वार्षिक दिनदर्शिका तयार करून प्रकाशित केली जाते. सदर दिनदर्शिका करिता ग्रामपंचायतीचा कोणताही खर्च न करता लोक सहभागातून खर्च केला जातो. हीच परंपरा कायम ठेवत सन २०२५ दिनदर्शिका तयार करून दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी समारंभात प्रकाशित करण्यात आली. त्याप्रसंगी वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार करण देवतळे यांचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद गंपावार होते. प्रा. डॉ.संदीप भेले, मुंबई यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. मंचावर आमदार करण देवतळे, आनंद निकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कालभूत, सरपंच मनीषा चौधरी, जिल्हा परिषद चे माजी सभापती कन्हैयालाल जयस्वाल, डॉ. सतीश अघडते, ग्रामसेवक येंचेलवर, आदर्श शिक्षक संजू जांभुळे, अँड. अरविंद पेटकर, अरुण चौधरी, अध्यापक ईश्वर टापरे, धिरज दारुंडे, उपसरपंच चंद्रहास मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
. याप्रसंगी उपस्थित नवनिर्वाचित आमदार देवतळे यांना गावाच्या विकासासंबंधी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य रमेश चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन माधुरी निब्रड व शितल साळवे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्राम संघ अध्यक्ष वंदना साळवे यांनी केले. कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


