Home सामाजिक अखेर बाम्हणी येथील जिप प्राथमिक शाळेला मिळाले शिक्षक !

अखेर बाम्हणी येथील जिप प्राथमिक शाळेला मिळाले शिक्षक !

1203

विद्यार्थी, गावकऱ्यात आनंद

नागभीड : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे ऑगस्ट 2023 ला एक शिक्षक निवृत्त झाल्याने दोन शिक्षिकांना वर्ग सांभाळणे कठीण झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तीन महिने होऊनही प्रशासनाने शिक्षक दिला नाही, त्यामुळे नवीन शिक्षक मिळावा याकरिता नवीन स्थापन झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा पाठपुरावा केला. शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षक मिळावा यासाठी वारंवार गटशिक्षण अधिकारी, गटसंवर्ग विकास अधिकारी यांना अर्ज दिले व पाठपुरावा केला होता व दैनिक नवजीवन ने बातमी प्रकाशित केली होती याची दखल घेत अखेर बाम्हणी येथील प्राथमिक शाळेला शिक्षक मिळाल्याने आनंद व्यक्त होत आहे.

.      संवर्ग गटविकास अधिकारी स्नेहल लाड यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ शिक्षक नियुक्ती करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकारी यांना दिले व गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी करीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक उपलब्ध करून दिला. दिनांक 3 जानेवारी 2024 ला विजय भेंडारकर हे शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाम्हणी येथे रुजू झाले. शिक्षक आल्याने विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. शाळा व्यवस्थापन समिती बाम्हणी आणि पालकांच्या वतीने आलेल्या शिक्षकाचे स्वागत करण्यात आले. संवर्ग गटविकास अधिकारी स्नेहल लाड, नागभीड, गटशिक्षणाधिकारी पालवे, केंद्रप्रमुख सातपुते यांचे गावकऱ्यांनी आभार मानले. सोबतच शिक्षक मिळावा याकरिता वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रकाशित करणाऱ्या पत्रकारांचेसुद्धा मनःपूर्वक आभार मानले.

बाम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला शिक्षक मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. शिक्षक मिळाल्याने नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. संवर्ग गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख यांनी बाम्हणी शाळेला शिक्षक मिळावा, याकरिता सहकार्य केले, बाम्हणी येथील शाळेचा आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकरिता अजूनही बरीच कामे करायची आहेत. याकरिता प्रशासनाने बाम्हणी येथील शाळेकडे गांभीर्याने लक्ष देऊन सहकार्य करीत राहावे, ही अपेक्षा आहे.                                                                                                                                             विराग वाकडे,                                                           अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, बाम्हणी

error: Content is protected !!