वर्गमित्रांनीच केला घात
आरोपी निघाला निलंबित पोलीस कर्मचारी
चंद्रपूर : चिमूर येथील गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि.10) नागपूर शहराजवळील हरिश्चंद्रवेळा गावाजवळ निर्जनस्थळी आढळून आलाय. दरम्यान, या महिलेच्या हत्येप्रकरणात पोलीसांनी नरेश डाहूले या चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेतील निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अरुणा काकडे (37) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे.
. चिमूर येथील देवांश जनरल स्टोर्सच्या संचालिका अरुणा काकडे या 26 नोव्हेंबर रोजी नागपुरातील इतवारी मार्केटमध्ये दुकानातील सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र अरुणा काकडे घरी न परतल्याने कुटुंबियांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. मिसिंग तक्रार असल्याने नागपूर आणि चंद्रपूर पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीचा छडा लावला आहे. निलंबित पोलीस कर्मचारी नरेश डाहूले याने अरुणा काकडे या महिलेचा गळा आवळून खून केला असल्याचे समोर आले आहे.
. अरुणा काकडे आणि आरोपी नरेश डाहूले लहानपणापासून एकाच शाळेत शिकले होते. दोघे वर्गमित्र होते. 26 तारखेला मृतक अरुणा आणि आरोपी नरेश नागपूरला एकत्र होते. दरम्यान, या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु झाला होता. दोघे नागपूरला गेले असताना दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने अरुणाचा गळा दाबून हत्या केली. दरम्यान, महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह हरिश्चंद्रवेळा येथील निर्जनस्थळी असलेल्या एका घरातील शौचालयाच्या टाकीमध्ये लवपला होता. त्यानंतर निलंबित पोलीस कर्मचारी असलेला आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांनी कॉल रेकॉर्डच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेत कर्मचारी असलेल्या नरेश डाहूलेचा चंद्रपूर शहरातील अनेक घरफोड्यांमध्ये समावेश आढळला होता. याच आरोपावरून त्याला मागील वर्षी अटक करून पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते.


