वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
मुख्यालयाची अॅलर्जी
सिंदेवाही : तालुक्यातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असलेले शासकीय, निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी अप-डाउन करीत असून, त्यांना मुख्यालयाची अॅलर्जी झाली असल्याने, आणि वरिष्ठ अधिकारी यांचे पूर्णतः दुर्लक्षपणामुळे नागरिकांना मिळणारे कागदपत्रे वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या कामाचा खेळ खंडोबा झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
. ग्रामीण भागातील शासकीय कर्मचारी, त्याच प्रमाणे तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. असे असताना मात्र ग्रामीण भागातील कोणतेही कर्मचारी गावातील मुख्यालयी कधीच थांबत नाही. त्यामुळे ग्राम पंचायत कडून मिळणारे दस्ताऐवज असोत किंवा तलाठी कार्यालयाकडून मिळणारे कागदपत्रे असोत, वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील कर्मचारी गावातच राहिल्यास ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या लवकर अवगत होऊ शकतात.
. सध्या प्रत्येक कार्यालयाकडून कागदपत्रे नागरिकांना घेणे आवश्यक झाले आहे. ग्राम पंचायत अधिकारी, तलाठी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, माध्यमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विभागाचे कर्मचारी, इत्यादी कर्मचारी हे तालुक्याच्या ठिकाणाहून दररोज अप डाऊन करीत असतात. त्यामुळे ते कधी येतात. तर कधी येत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना संबंधित कर्मचारी अधिकारी यांची वाट बघत कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे. तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सुद्धा चंद्रपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, गडचिरोली, इत्यादी ठिकाणाहून अप डाऊन करीत असल्याने कधीच वेळेवर कार्यालयात पोहचत नाही. मात्र ग्रामीण भागातील नागरिक आपले काम लवकर व्हावे, या हेतूने घरून सकाळी निघून १० वाजता पासून संबंधित अधिकारी कर्मचारी यांची वाट बघत कार्यालयात बसून असतो. मात्र संबंधित अधिकारी हे दुपारी कार्यालयात पोहचतात. त्यानंतर चाय पाणी घेण्यासाठी कार्यालयाबाहेर जातात.
. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी गेलेल्या नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करून सायंकाळी थंडीमध्ये कुळकुळत घरी यावे लागत आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे कोणीही लक्ष घालत नसल्याने कर्मचारी वर्गाचे चांगलेच फावत आहे. ग्रामीण भागातील कर्मचारी, तसेच तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या कामाचा खेळ खंडोबा होताना दिसत आहे.
. ग्रामीण भागातील कर्मचारी यांचेवर वरिष्ठ अधिकारी यांचा कोणताच वचक नसल्याने, आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाची अॅलर्जी असल्याने आजकाल कोणताच कर्मचारी मुख्यालयी राहण्याचे धाडस करीत नाही. त्यामुळे शासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाही करावी. अशी ग्रामीण जनतेकडून मागणी करण्यात येत आहे.


