ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात वंचित आघाडीला विविध समाजाचा पाठिंबा
सिंदेवाही : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे तापमान भक्कम वाढले असून प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली असताना ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. राहुल मेश्राम यांना अनेक समाजानी आपला पाठिंबा दर्शविला असून डॉ. राहुल मेश्राम यांचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली असल्याने विरोधकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा अपप्रचार करणे सुरू केले असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे चंद्रपूर जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष डॉ राजपाल खोब्रागडे यांनी माध्यमांना दिली आहे.
. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या मैदानात एकूण ११ उमेदवार रिंगणात असून भारतीय जनता पार्टी, कांग्रेस, आणि वंचित बहुजन आघाडी यांचेमध्ये तिरंगी लढत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात बौद्ध मतदारांची संख्या लक्षणीय असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बौद्ध समाजाचे असल्याने बौद्ध समाज एकवटला आहे. आणि डॉ. राहुल मेश्राम यांचे पाठीमागे भक्कमपणे उभा आहे. त्या पाठोपाठ चीमुरचे उमेदवार हे माना जमातीचे असल्याने त्यांनी ब्रम्हपुरी क्षेत्रातील माना समाजांच्या मतदारांना कामाला लावले आहे. त्यासोबत बल्लारपूर क्षेत्रातील उमेदवार हे कुणबी समाजाचे असून त्यांनी सुद्धा ब्रम्हपुरी क्षेत्रातील कुणबी समाजाला कामाला लावले आहे. वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा उमेदवार हितेश मडावी हे आदिवासी समाजाचे असून ते स्वतः आदिवासी समाजात जावून समाजातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आवाहन केले असल्याने अनेक आदिवासी समाजातील कार्यकर्ते वंचितच्या प्रचाराला लागले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांना मानणारा समाजातील सुशिक्षित मतदार सुद्धा वंचित बहुजन आघाडी सोबत असल्याने सध्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम यांचा जनाधार वाढला आहे.
. वंचित आघाडीच्या वाढत्या पाठिंब्यामुळे विरोधकांची पाया खालची वाळू सरकली असल्याने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे भाजप ने उभे केले आहे, वंचित आघाडीचा उमेदवार काँग्रेसकडे पॅक झाला आहे. असा विरोधकांनी अपप्रचार करणे सुरू केला असल्याचा आरोप डॉ. राजपाल खोब्रागडे यांनी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणारा बौद्ध समाज, तसेच समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी, यांनी आपला निर्णय पक्का करून यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम यांचे सोबत असून त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असल्याने विरोधकांची चांगलीच झोप उडाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम हे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात नक्कीच परिवर्तन करतील असा आशावाद सुद्धा डॉ.राजपाल खोब्रागडे यांनी व्यक्त केला आहे.


