Home राजकीय ब्रम्हपुरीत “बौद्धांच्या”  मतांवर ठरणार कांग्रेस , भाजपाच्या विजयाचे गणित

ब्रम्हपुरीत “बौद्धांच्या”  मतांवर ठरणार कांग्रेस , भाजपाच्या विजयाचे गणित

1291

वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

सिंदेवाही : राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान घेण्यात येत आहे. सर्वच पक्षाने आपापल्या पक्षाच्या स्टार प्रचारकाना विधानसभा क्षेत्रात आणून प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रामुख्याने कांग्रेस – भाजपा यांच्यामध्ये  थेट लढत असली तरी राज्यात तिसरा पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी टक्कर देण्यासाठी पुढे आली आहे. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, भाजपचे कृष्णलाल सहारे, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. राहुल मेश्राम यांच्या प्रचाराचा घमासान सुरू झाला असून कांग्रेस आणि भाजपचे उमेदवार आपापल्या विजयाचे अंदाज बांधत असले तरी या क्षेत्रातील बौद्ध मतांवर कांग्रेस आणि भाजपचे विजयाचे गणित ठरणार असल्याचे मतदारांमध्ये बोलल्या जात आहे.

.       ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कुणबी,आणि बौध्द यांच्या मतांची टक्केवारी भक्कम असून आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये बौद्ध मतदारांना आपल्याकडे वळविण्यात काँग्रेस पक्षाला यश आले आहे. बौद्ध मतदार गटागटात विखुरले असल्याने त्यांचा फायदा कांग्रेस पार्टीने घेतला असला तरी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचे नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने राज्यात आपली भक्कम ओळख निर्माण केली आहे. वंचित बहुजन आघाडी ही पार्टी  राज्यातील अनेक उमेदवारांचे विजयाचे किंवा पराभवाचे गणित बदलू शकते. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार हे बौद्ध मतांवर अवलंबून असून बौद्ध मते आपल्याकडे वळविण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली आहे. तर भाजप उमेदवार कृष्णालाल सहारे हे सुद्धा बौद्ध मतदार वंचित बहुजन आघाडीकडे गेल्यास आपला विजय निश्चित असल्याचे अंदाज व्यक्त करीत आहेत.

.       एकंदरीत ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील बौद्ध मतदार हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम यांचे बाजूने भक्कमपणे उभे असल्याचे सध्याचे चित्र दिसून येत असल्याने वंचित बहुजन आघाडी या क्षेत्रात निर्णायक ठरणार आहे. मात्र असे असले तरी एका रात्रीतून बौद्ध समाजाचे चित्र बदलू शकते. अशी जाणकार मतदारांमध्ये चर्चा केल्या जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ राहुल मेश्राम यांनी सध्या प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. या उलट काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार आणि भाजपचे उमेदवार कृष्णालाल सहारे या दोन्ही उमेदवारांनी प्रचारात कोणतीच कसर सोडलेली नाही. त्यामुळे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेस असो की भाजपा असो, दोघांचेही विजयाचे गणित बौद्ध मतांवर अवलंबून असल्याचे दिसून येत आहे.

error: Content is protected !!