प्रा. सोमाजी गोंडाने यांचे स्पष्टीकरण
चंद्रपुर : गेल्या अनेक वर्षापासून बल्लारपूर तालुक्यासह जिल्ह्यात वंचित पक्षाने जनसेवेचे निरंतर कार्य करीत पक्ष बळकट करून ताकत वाढविली. त्यामुळेच पक्षातून निलंबित केलेल्या कार्यकर्त्यांना पुढे करून संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप करीत आहे. बल्लारपूर तालुक्यातील रमेश लिंगलपल्लीवर या कार्यकर्त्याने लोकसभेत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यास पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेऊन त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. त्याचा वंचित पक्षाशी कसलाही संबंध नाही. असे वंचितचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
![]()
रमेश लिंगलपल्लीवर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केल्याचे समजते. वंचित सोडून भाजपात 200 कार्यकर्त्यांसह प्रवेश केल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक त्यांना पक्षातून कधीचेच काढण्यात आले असल्याने त्याचा तिळमात्र संबंध वंचितशी नाही. त्याचे जाण्यामुळे पक्षाला कुठलाच परिणाम होत नसून सतत पक्ष फेरबदल करीत असल्याने त्याची किंमत कुठेही होत नसल्याने केवळ संभ्रम निर्माण करीत आहे. या निवडणुकीत वंचितचे सतीश मालेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील वंचितचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात मुसंडी मारत इतर पक्षाला घाम फोडला आहे. अशात काही उमेदवारांनी वंचितला बदनाम करण्यासाठी नतभ्रष्ट लोकांना पुढे करून मतदारात वास्तविक प्रचार करण्यासाठी पुढे करून डाव साधण्याचा प्रयत्न करीत आहे.अशांना वंचितचा कार्यकर्ता व मतदार भीक घालणार नाही.स्वाभिमानी कार्यकर्ता कधीच आंबेडकरी विचाराशी तडजोड व प्रतारणा करणार नाही.भाजप व काँग्रेस पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची भीती वाटत असून त्याच पक्षात फुटीचे खिंडार पडत आहे.तळागाळातील जनतेच्या समस्या व ओबीसी,एससी, आदिवासींचे आरक्षण संपविण्याचा घाट भाजप,काँग्रेस रचत असून आता हा समाज या पक्षातील उमेदवाराना नाकारण्याचा पवित्रा घेतला आहे.न्याय,हक्क व आरक्षणाच्या लढाईत बहुजन उतरला असून येथील जातिवंत पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरली आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात वंचित अबाधित असून बेताल कार्यकर्त्यांच्या जाण्याने वंचितला काहीही परिणाम होणार नाही असे मत वंचितचे जिल्हाध्यक्ष सोमाजी गोंडाने यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.


