महेंद्र कोवले
सिंदेवाही : २० नोव्हेंबर रोजी होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा घमासान सुरू झाला असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात भाजप विरुद्ध कांग्रेस यांचे दरम्यान थेट लढत होत असल्याने भाजपचे कृष्णलाल सहारे हे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा विजय रथ रोखणार ? की, वडेट्टीवार तिसऱ्यांदा बाजी मारणार? याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.
. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेस कडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपा कडून जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष कृष्णलाल सहारे यांना रिंगणात उतरविले आहे. भाजप कडून यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली असल्याने भारतीय जनता पार्टीच्या गोठात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचे समोर तगडे आव्हान नसल्याचे कांग्रेस समर्थकांकडून बोलल्या जात आहे. असे असले तरी मागील २०१९ ची निवडणूक ही वडेट्टीवार यांचेसाठी प्रतिष्ठेची झाली होती.
. यावेळी भारतीय जनता पार्टीने स्थानिक असलेला नवीन चेहरा उमेदवार म्हणून दिला असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. राहुल मेश्राम हे विजयाचे गणित बदलवणार का ? अशी चर्चा विधानसभा क्षेत्रात सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे मागील १० वर्षापासून या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करीत असून त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर ते विजयी होण्याचे सांगत असले तरी दुसरीकडे भाजपचे कृष्णलाल सहारे हे कुणबी समाजाचे असून हा समाज ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणात असल्याने जातीचा फायदा कृष्णलाल सहारे यांना झाल्यास वडेट्टीवार यांना ते शह देतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी मतदारांमध्ये भाजपचे “कृष्ण” हे काँग्रेसचा “विजय” रथ रोखतील का ? असा तर्क लावल्या जात आहे


