पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी
धान पिकासह कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान
नेरी : 12 ऑक्टोबर ला पहाटे 3 वाजताच्या सुमारास झालेल्या अचानक वादळी वाऱ्यासह परतीच्या मुसळधार पावसाने धानपिकाचे तसेच कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने सदर पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.
. चिमुर तालुक्यात सिरपूर बोथली, अडेगाव को, काजळसर, मोटेगाव, लोहारा, रामपूर, खांबाडा, शिवनपायली, बोळधा, लावारी, गोरवठ, नवतळा आदी गावसाहित अनेक गावात अचानक आलेल्या वादळ वाऱ्या सहित पडलेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक हेक्टर वरील पीक वाऱ्याने जमीनदोस्त झाले. यात हलक्या व मध्यम प्रतीच्या धानाचे खूप मोठे नुकसान झाले आहे तसेच कापूस पीक सुद्धा जमिनीवर पडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. पीक ऐन जोमात असून कापणीला आले होते आता पीक कापून धान्य घरी न्यावे अशी परिस्थिती असताना निसर्गाने घात केला वादळ वाऱ्यासाहित पाऊस आल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आणि शेतकरी वर्ग पुन्हा एकदा हतबल झाला असून निसर्गाच्या फेऱ्यात नेस्तनाभुत झाला आहे तेव्हा शासनाने या नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी दीपक झोडे सहित अनेक शेतकरी करीत आहेत.


