नागभीड : नागभीड येथील काॅंग्रेस कार्यकर्त्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी एका प्रकरणात भाजपच्या दबावाखाली येऊन सुडबुद्धीने कारवाई केली. असा आरोप जि.प.चे माजी अध्यक्ष व चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतीश वारजूकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
. वारजूकर यांनी सांगितले की, निवडणूक काळात काॅंग्रेसचे कार्यकर्ते अरूण गायकवाड यांनी एका व्हाट्सॲप गृपवर फिरत असलेला व्हिडिओ दुसर्या व्हाट्सॲप गृपवर फारवर्ड केला. हा व्हिडिओ गृपवर आल्यानंतर या व्हिडीओ चा आधार घेऊन अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या भावना दुखावल्या असा आरोप करून भाजपच्या कार्यकर्त्यानी पोलिसांत तक्रार दाखल केली.
. तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी प्रकरणाची कोणतीही शहानिशा न करता केवळ भाजपच्या दबावाखाली काॅंग्रेस कार्यकर्ते व व्हिडीओ फारवर्ड करणारा अरूण दिवाकर गायकवाड व गृप ॲडमीन अमोल मुरलीधर वानखेडे यांचेवर माहिती व तंत्रज्ञान कायदा तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांनी जवळपास सव्वा महिना काहीच हालचाल केली नाही आणि ३ मे २०२४ रोजी गायकवाड व वानखेडे यांना बयान देण्यासाठी या असे ठाणेदार विजय राठोड यांचेमार्फत सांगून पोलिस ठाण्यात बोलावले व त्यांना अटक केली असा आरोप वारजूकर यांनी केला.
सदर प्रकरणात तथ्य नसल्यामुळे सदर पोलिसांना जमानत देण्याचा अधिकार असताना सुद्धा सदर पोलिस अधिकारी दबावात येऊन त्यावेळी जमानत सुध्दा दिली नाही.
. या बाबीची तक्रार आम्ही शासन व वरिष्ठ अधिकारी यांचेकडे करणार असल्याचे वारजूकर म्हणाले. यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष गोविंद भेंडारकर, शहर अध्यक्ष किशोर समर्थ, तालुका सेवादल अध्यक्ष डॉ. रवींद्र कावळे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश कुर्झेकर,माजी नगरसेवक प्रतीक भसीन, अमोल वानखेडे, अरूण गायकवाड उपस्थित होते.


