Home सामाजिक वासेरा येथे दोन दिवसीय वाल्मीक ऋषी महोत्सव साजरा

वासेरा येथे दोन दिवसीय वाल्मीक ऋषी महोत्सव साजरा

1274

सिंदेवाही : रामायण या महान ग्रंथाचे रचियते महर्षी वाल्मीक ऋषी यांचे जयंतीचे औचित्य साधून वासेरा येथील ढीवर समाज संघटना यांचे वतीने नुकताच दोन दिवसीय वाल्मीक ऋषी महोत्सव साजरा करण्यात आला असून हा महोत्सव समाज बांधवांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे.

.        सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे ढिवर समाज हा संख्येने बहुसंख्य असून या समाजात अशिक्षितांचे प्रमाण जास्त असल्याने हा समाज मुख्य प्रवाहातून दूर गेला असला तरी समाजातील सुशिक्षित तरुणांनी सामाजिक दायित्व स्वीकारत समाजातील अज्ञान दूर करण्याच्या हेतूने गावात नुकतेच रामायण रचनाकार महर्षी वाल्मीक ऋषी दोन दिवसीय महोत्सव आयोजित केला. या निमित्ताने ढीवर समाज संघटना यांचे वतीने दोन्ही दिवशी सकाळी पाच वाजता गाव स्वच्छ करून टाळ उभा केला. दिवसभर विविध गावातील भजन मंडळांनी भजन सादर करून गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले. सायंकाळी ४ वाजता महर्षी वाल्मीक ऋषी यांचे प्रतिमेची भव्यदिव्य मिरवणूक काढून सर्व गाववासियांना मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करीत गावात एकोपा निर्माण करण्याचे काम केले. मिरवणुकीमध्ये विविध संतांचे वेश परिधान करून देखावे सादर केले. तर अनेक गावातील महिला मंडळींनी वारकरी भजनाच्या तालावर नृत्य करीत मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.

.        दुसऱ्या दिवशी दिवसभर विविध भजन मंडळांनी भजन सादर केले. दुपारी ३ वाजता मान्यवर पाहुण्यांचा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ढीवर समाज संघटना नांदगाव येथील अरुण सहारे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. तर मुख्य मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील संघर्ष वाहिनी चे दीनानाथ वाघमारे, सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश डाहरे, रामाळा येथील सरपंच अरविंद मेश्राम, तर विशेष अतिथी म्हणून उमाताई डाहरे, नामदेव आत्राम, भिकाजी शेंडे, यांचेसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. यावेळी संत महंतांच्या जयंती साजरी करीत असताना समाजानी अंधश्रद्धा, दैववाद नाकारून विज्ञानवाद स्वीकारावा, आणि आपल्या लेकरांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून उच्च विद्याविभूषित करावे, कारण शिक्षणाने माणसाची प्रगती होते. आपल्या समाजाला शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. आपला परंपरागत व्यवसाय करीत असताना इतर छोट्या मोठ्या उद्योगाकडे लक्ष घाऊन आपले जीवन प्रगतीच्या शिखरावर न्यावे. असे मौलिक विचार मान्यवर पाहुण्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

.        कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्राम पंचायत सदस्य दिलीप मेश्राम, संचालन राजू मेश्राम, तर संजय मेश्राम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. रात्री ९ वाजता कोळी गीतावर सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!