नागरिकांची प्रतीक्षा संपली
शिवप्रेमी उत्साहात
गडचांदूर : औधोगिक नगरी गडचांदूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजाचा भव्य पुतळा निर्माण व्हावा अशी शिवभक्त नागरिकांची कामना होती. उशिरा का होईना पण अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती व आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंती दिनी करण्यात आले.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या तर लोकार्पण आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. तर विशेष अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, नगराध्यक्ष सविता टेकाम, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यावेळी मंचावर उपस्थित होते.
शहरात विविध कार्यक्रमाची मेजवानी आणि आकर्षक रोषणाई : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समितीच्या वतीने गडचांदूर शहरात शिवजयंती दिनी सकाळी बाईक रॅली, रक्तदान शिबीर, छत्रपती शिवरायांची भव्य मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा स्पर्धा व संदीप औताडे संभाजीनगर यांचे शिवव्याख्यान आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण शहरात तोरण, झेंडे, आकर्षक रोषणाई, फुलांची सजावट यांनी गडचांदूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.


