दोन लाखांची रोकड पळवली : राजुरा-वरूड रोडवरील घटना
चंद्रपूर
. पेट्रोलपंपावरील सुरक्षारक्षकाला बंदुकीचा धाक दाखवून त्याच्याकडून चावी हिसकावून एक लाख ९० हजार रुपये पळविल्याची घटना राजुरा वरुर रोडवरील साईकृपा पेट्रोलपंपावर घडली. या घटनेने शहरात दहशत पसरली आहे. पाचही जण सीसीटीव्हीत कैद झाले असल्याची माहिती आहे.
![]()
. राजुरा शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर दिनबाग तांडा यांच्या मालकीचे साईकृपा पेट्रोलपंप आहे. ६ जानेवारीला रात्रीपासून सुरक्षारक्षक तैनात होता. दरम्यान, पहाटे ३ वाजताच्या सुमारास अज्ञात पाच व्यक्ती अचानक पंपावर आले. बंदुकीचा धाक दाखवून तेथील सुरक्षारक्षकाकडून चावी हिसकावली; तसेच पंपावरील विक्रीची एक लाख ९० हजार रुपयांची रक्कम घेऊन पसार झाले. पेट्रोलपंपावरील व्यवस्थापकाने पोलीस स्टेशनला माहिती दिली.
. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे, राजुरा येथील पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, विरूर स्टेशनचे पोलीस निरीक्षक निर्मल जयप्रकाश यांनी घटनास्थळाला भेट दिली. सीसीटीव्ही चेक केला. यावेळी २० ते २५ वर्षांच्या आतील पाच तोंडाला पट्टे बांधून, हातात शस्त्र घेऊन आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण ठिकाणी नाकाबंदी केली. अज्ञाताविरुद्ध कलम ३९५, ३९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


