अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करीत असल्याचा लेखापाल यांचा आरोप
सिंदेवाही
. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका कार्यालय सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या वासेरा येथील सखी ग्राम संघाच्या अध्यक्षा नीलिमा डूबेदास कोवले या मागील सहा वर्षांपासून संघाच्या अध्यक्षा असल्याने त्यांचा संघात एकहाती कारभार सुरू असून कोणत्याही पदाधिकारी यांना विश्वासात न घेता आपल्या पदाच दुरुपयोग करीत असल्याचा आरोप करीत त्यांना अध्यक्ष पदावरून त्वरित हटविण्यात यावे, अशी मागणी संघाच्या लेखापाल मीना बोरकर यांनी दिलेल्या तक्रारीतून केलेली आहे.
. नीलिमा कोवले या मागील सहा वर्षांपासून सखी ग्राम संघाच्या अध्यक्षा असून दर दोन वर्षांनी संघातील पदाधिकारी यांचे पुनर्गठन करण्यात येते. मात्र पुनर्गठन करण्याचा विषय जेव्हा जेव्हा सभेमध्ये येते, तेव्हा त्या सभेतील महिलांना नीलिमा कोवले या धमकावून सदर विषय अहवाल बुकामध्ये घेण्यास नकार देत असतात. नीलिमा कोवले यांनी सहावर्षात आपल्या पदाचा दुरुपयोग करीत गावातील दुसऱ्या ग्राम संघाला विश्वासात न घेता आपल्या पदाचा वापर करून गावात कृषी सखी पदाची भरती करीत असताना कोणतीही जाहिरात न करता चुपचाप आपल्या मर्जीतील व्यक्तीला अर्ज करायला सांगितले. याबाबत एका दुसऱ्या महिलेला याची माहिती पडताच त्यांनी घाईघाईत अर्ज नेवून दिला. मात्र त्या अर्जावर महिलेने स्वाक्षरी केली नव्हती. तेव्हा तो अर्ज अध्यक्ष पदाचा गैरवापर करून कोणतेही अधिकार नसताना स्वतःच अर्ज रद्द केला. आणि आपल्या मर्जीतील व्यक्तीची कृषी सखी म्हणून निवड केलेली आहे. तसेच कृषी व्यवस्थापक म्हणून पद भरती करीत असताना वय मर्यादा संपलेल्या व्यक्तीला अनुभव आहे म्हणून यांनाच घ्या. असा आग्रह करून पात्र उमेदवाराचा अर्ज रद्द केला.
. ग्राम संघातून कर्जाची उचल केल्यानंतर त्याची परतफेड करणाऱ्या महिला अध्यक्षा म्हणून नीलिमा कोवले यांचेकडे पैसे जमा करतात. मात्र ती रक्कम बँक खात्यात जमा न करता परस्पर खर्च करीत असल्याने आतापर्यंत अध्यक्षाकडे ४०,००० रुपयाची थकबाकी निघाली आहे. सखी ग्राम संघाचे सर्व रेकॉर्ड ठेवण्यासाठी संघाचे कार्यालय असून स्वतंत्र कपाट आहे. मात्र सर्व रेकॉर्ड अध्यक्षा स्वतःच्या घरी ठेवत असतात. सखी ग्राम संघाच्या सचिवाची बोगस स्वाक्षरी करून अध्यक्षा नीलिमा कोवले यांनी अनेकदा बँकमधील आर्थिक व्यवहार सुद्धा केलेला आहे.
. मी संघाची लेखापाल असून मला अध्यक्षाच्या सर्व गोष्टी माहित असल्याने मला लेखापाल या पदावरून हटविण्यासाठी अध्यक्षा जीवाचा आटापिटा करीत आहेत. यासाठी त्यांनी सखी संघाचा बोगस ठराव सुद्धा लिहून प्रभाग संघाच्या मासिक सभेत दाखविला आहे. सखी ग्राम संघाच्या अध्यक्षा नीलिमा कोवले या भरारी प्रभाग संघाच्या सुद्धा अध्यक्षा असल्याने प्रभागात सुद्धा यांचा एकहाती कारभार सुरू असून त्यांना प्रभाग समन्वयक आशिष दरडे, तालुका व्यवस्थापक उद्धव मडावी आणि इतर कर्मचारी सहकार्य करीत असून या सर्वांच्या संगनमताने सखी ग्राम संघाच्या प्रोसेडिंग बुकातील ठराव फाडून बोगस ठराव लिहून ठेवला असल्याचा आरोप करीत भविष्यात ग्राम संघात आणि प्रभाग संघात मोठा भ्रष्ट्राचार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्वरित सखी ग्राम संघाच्या अध्यक्षा नीलिमा कोवले यांना हटविण्यात यावे अशी मागणी लेखापाल मीना बोरकर यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा प्रकल्प संचालक, तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.


