नागभीड : हरीयाणा राज्यातील सोनीपत येथे दि. 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत पार पडत असलेल्या 51 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनीत कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नागभीड येथील विज्ञान शिक्षिका प्रतीभा सोमेश्वर कायरकर यांच्या मार्गदर्शनात विद्यालयातील बाल संशोधक अर्थ संजय दुपारे व हर्ष तुलाराम बागडे हे इलेक्ट्रिक टेस्टर फॉर ह्युमन सेफ्टी या आपल्या विज्ञान प्रतिकृतीसह सहभागी झाले आहेत.
. जानेवारी 2024 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या 51 व्या राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत विद्यालयाचे विद्यार्थी अर्थ दुपारे व हर्ष बागडे या बाल संशोधकांनी विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका प्रतिभा कायरकर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपल्या कल्पकतेने तयार केलेल्या प्रतीकृतीची उत्तम मांडणी, उत्कृष्ट सादरीकरण व उच्चतम समाज उपयोगिता या बळावर इयत्ता नववी ते बारावीच्या गटातून द्वितीय क्रमांक पटकावीत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली होती.
राज्यात मागास जिल्हा म्हणून ओळखल्याजाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक बाबतीत अतिशय सामान्य तालुका असलेल्या नागभीड येथील सर्व साधारण कुटुंबातील व ग्रामीण विद्यार्थ्यांची ज्ञानदायीनी म्हणून सर्वदूर परिचित असलेल्या कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची, कल्पकतेची व संशोधक वृत्तीची चुणूक दाखवून गगनभरारी घेत विद्यालय, तालुका व जिल्ह्याचा नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखीत केले आहे. तसेच 2020 – 21 मध्ये झालेल्या ईंस्पायर अवार्ड राष्ट्रीय प्रदर्शनीत याच विद्यालयाच्या व प्रतीभा कायरकर यांच्याच मार्गदर्शनात जिवतोडे या विद्यार्थ्यीनीच्या अखंड ज्योत या प्रतीकृतीची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली होती .
. दि. 26 ते 31 डिसेंबर2024 या कालावधीत सोनिपत येथे पारपडत असलेल्या राष्ट्रीय बाल विज्ञान प्रदर्शनीत विद्यालय, तालुका, जिल्हा व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ही चमू नागभीड येथून रवाना झाली असून त्यांच्या या कार्यासाठी व यशासाठी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) पातळे, डाएटचे प्राचार्य डॉ. हिवारे, गोंडवन विकास संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, सचिव रविंद्र जनवार, संचालिका वर्षा जनवार तथा सर्व सन्माननीय संचालक वृंद, गटशिक्षणाधिकारी पालवे, विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले, पर्यवेक्षक युवराज ईडपाचे, सर्व प्राध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक तथा विद्यार्थी वर्ग आणि नागभीडकर वासीयांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


