१५ सप्टेंबर पर्यंत ई-पीक पाहणी या ॲपद्वारे पीक पेरा नोंदणी करणे अनिवार्य
सिंदेवाही : राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १ ऑगस्ट पासून ई – पीक पाहणी या ॲप द्वारे शेतातील पीक पेरा नोंदणी करणे सुरू झाले असून १५ सप्टेंबरपर्यंत ई पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पीक पेरा नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ई-पीक पाहणी या ॲप द्वारे पीक पेरा नोंदणी करताना काही अडचणी आल्यास शेतकऱ्यांनी गावातील खाजगी सहाय्यक असलेले कोतवाल, पोलीस पाटील तथा ग्राम पंचायत कर्मचारी यांचे सोबत संपर्क करावा. असे आवाहन सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांनी शेतकऱ्याना केले आहे.
. तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांना शेती विकासाच्या विविध योजनांचा लाभ सहज मिळावा, पीककर्ज, पीकविमा, पिकाची नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्ती काळात चांगली शासकीय मदत मिळावी, याकरिता ई-पीक पेऱ्याची नोंद असणे गरजेचे आहे. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पेरा नोंदणी १५ सप्टेंबर पूर्वी करून घ्यावी. शासनाकडून पीकविमा योजना, नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान जाहीर झाल्यास ते वाटप करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पीक पेऱ्याची नोंद ई-पीक पाहणी या ॲप द्वारे करणे गरजेचे आहे. नोंद न केल्यास शासनाकडून मिळणारे शेतीविषयक अनुदान मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या शेतातील पीक पेऱ्याची नोंद ई-पीक पाहणी या ॲप द्वारे तात्काळ करून घ्यावी. तसेच या कामात काही अडचणी निर्माण झाल्यास आपल्याच गावातील खाजगी सहाय्यक म्हणून नियुक्त केलेले कोतवाल, पोलीस पाटील, ग्राम पंचायत कर्मचारी, यांचे सोबत संपर्क करावा. असे आवाहन तहसीलदार संदीप पानमंद यांनी केले आहे.


