वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

26

मुल तालुक्यातील जानाळा येथील घटना

मुल : चराईसाठी जंगलात गुरे घेवून गेलेल्या गुराख्यावर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना रविवारी (दि.१) दुपारी २.३० दरम्यान घडली. ही घटना मूल वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जानाळा बीट कक्ष क्रमांक ३५३ मध्ये घडली. गुलाब हरी वेळमे(५२)असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे.

.      नेहमीप्रमाणे गुलाब वेळमे व इतर ३ गुराखी जंगलात गुरे चराईसाठी गेले. गुरे चराई करताना दबा धरून असलेल्या वाघाने गाई वर हल्ला केला. लागलीच गुलाबने वाघाच्या तावडीतून गाईला वाचविण्यासाठी गेले असता वाघाने गुलाब वर हल्ला केला व जागीच ठार केले. यावेळी सोबत असलेल्या तीन गुराख्यानी घाबरलेल्या अवस्थेत आरडाओरड केली असता वाघाने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आर.ए.कारेकर, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, क्षेत्र सहाय्यक ओ.एस.थेरे, वनरक्षक एम.टी.पांडव, एन.वाय.बोरकर, पी.एम.कुळमेथे घटनस्थळी दाखल होवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.