वासेरा-गडबोरी मार्गे बस सुरू करण्यासाठी आ. भांगडीया यांना सरपंचाचे साकडे

470

सिंदेवाही तालुक्यातील २२ गावातील विद्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित

सिंदेवाही : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रामाळा सिंदेवाही मार्गावरील बोकडडोह नदीवरील पुलाचे बांधकाम सुरू केले असल्याने तसेच पर्यायी मार्ग असलेल्या कळमगाव गन्ना गावाजवळील रस्ता पुरामध्ये वाहून गेल्याने दोन्ही मार्गाच्या बसेस बंद झाल्या असून या परिसरातील २२ गावातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित झाले आहेत. क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांची याकडे दुर्लक्ष केले असल्याने अखेर वासेरा,आणि रामाळा गावातील सरपंचांनी चीमुरचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना साकडे घालत वासेरा – गडबोरी मिनघरी मार्गे सिंदेवाही साठी बस सुरू करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.

.         सिंदेवाही हे तालुक्याचे ठिकाण असून येथे केजी पासून तर पिजी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी ये जा करीत असतात. यासाठी एस. टी.महामंडळाच्या चिमूर आगाराची बस चिमूर वरून मासळ-पिपर्डा मार्गे सिंदेवाही ला जात असल्याने या परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना सिंदेवाहीला ये जा करण्यासाठी ही बस सोयीची झाली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर रामाळा गावाजवळील नदीवरचा पूल तोडून दुसऱ्या मोठ्या पुलाचे बांधकाम करणे सुरू केले असल्याने सदर मार्ग बंद करण्यात आला. पर्यायी मार्ग म्हणून कळमगाव गन्ना या मार्गाने बस सुरू करण्यात आली होती.

.         मात्र कळमगाव जवळ सहामहिण्यापूर्वी बनविलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने रस्त्यावर मोठे भगडाद पडले आहे. त्यामुळे या मार्गाची बस सुद्धा बंद करण्यात आली. परिणामी तालुक्यातील २२ गावातील विद्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित झाले आहेत. याबाबत अनेक वर्तमान पत्रातून पर्यायी मार्गाने बस सुरू करण्याची मागणी करीत बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र एरवी तालुक्यात मयत झालेल्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करणारे या भागाचे आमदार तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीकडे कानाडोळा केला असल्याचे दिसून आले. त्यामुळे वासेरा ग्राम पंचायत चे सरपंच दिलीप मेश्राम तसेच रामाळा ग्राम पंचायतचे सरपंच अरविंद मेश्राम यांनी चिमूर क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांना साकडे घालून चिमूर वरून सुटणारी बस वासेरा पर्यंत न आणता ती बस गडबोरी मिनघरी मार्गे सिंदेवाही साठी सोडण्यात यावी. अशी मागणी केली आहे.