- चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाची कारवाई
- बल्लारपूर – चंद्रपूर मार्गांवरील विसापूर फाट्याजवळील घटना
विसापूर : चंद्रपूर – बल्लारपूर मार्गादरम्यान एक इसम दुचाकीने येत होता. त्याच्या पाठीमागील काळ्या रंगाच्या बॅग मध्ये रोकड असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे त्या इसमाची झडती घेतली असता त्याच्या बॅग मध्ये तब्बल २४ लाख ७५ हजार रुपये नगदी रोकड आढळून आली. ही कारवाई चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने गुरुवार (दि. ७) रोजी चंद्रपूर – बल्लारपूर मार्गांवर विसापूर फाट्याजवळ केली. याप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केलेल्या इसमाचे नाव ज्ञानेश्वर रमेश चांदणबटावे ( 34 ) रा.११२ ई.डब्लू. एस. नंदनवन सदभावना नगर नागपूर असे आहे. तो आयुर्वेदिक औषधी व्यवसायिक असल्याची माहिती आहे.
. ज्ञानेश्वर चांदणबटावे हा दुचाकीने बल्लारपूर कडून चंद्रपूर कडे दुचाकीने जात होता. त्याच्या जवळ मोठी रोकड काळ्या रंगाच्या बॅग मध्ये आहे.ही माहिती एका खबऱ्याने पोलिसांना दिली.या माहितीची खात्री करण्यासाठी चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांनी पथकाच्या माध्यमातून त्याला विसापूर फाट्याजवळील वळणावर अडविले.त्यावेळी ज्ञानेश्वर ने तुम्ही कोण म्हणून विचारणा केली.त्यावेळी पोलिसांनी ओळखपत्र दाखवून त्याच्या बॅग ची झडती घेतली.
. ज्ञानेश्वरच्या बॅग मध्ये झडती दरम्यान ५00 च्या ४६५२ नोटा, २00 च्या ७४५ नोटा असा एकूण २४ लाख ७५हजार रुपये नगदी रोकड आढळून आली. एवढी मोठी रक्कम त्याच्याजवळ नगदी आढळून आल्यामुळे चोरी अथवा अवैध मार्गाने मिळवलेली रोकड असल्याच्या संशयास्पद कारणावरून कलम ४१ (१) (ड) द. प्र. सं. अन्व्ये रोकड ताब्यात घेण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावर यांच्या नेतृत्वात हर्षल एकरे, विनोद मुरले, संजय आतकुलवार, संतोष यलपुलवार, गोपाल अटकुळवार, नितीन रायपूरे यांनी केली. या घटनेचा अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले करत आहे.


