मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमात ९१ शाळांचा सहभाग
सिंदेवाही : राज्य शासनाने जिल्हा परिषद मार्फत नुकताच मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हा उपक्रम राबविला होता. त्यानुसार चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत सिंदेवाही तालुक्यात या उपक्रमात एकूण ९१ शाळा सहभागी झाल्या होत्या. त्यामधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नाचनभट्टी या शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला असून परिसरात सर्वच स्तरावरून शाळेचे अभिनंदन करण्यात येत आहे.
. नाचणभट्टी येथील शाळेचा दर्जा उत्तम ठेवत लोकसहभाग, विद्यार्थ्यांचा गुणात्मक दर्जा, शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग, आणि शिक्षकांचे प्रचंड परिश्रम, या सर्वांमुळे शाळा ही तालुक्यातून प्रथम आलेली आहे. या शाळेतील महेंद्र खोब्रागडे, मोरेश्वर नेवारे, आप्पाजी डोंगरवार, हे तीन शिक्षक, १ प्रतिनियुक्तीवरील शिक्षक असून २ विषय शिक्षकांची पदे रिक्त असताना शाळेचे मुख्याध्यापक विजयानंद लोखंडे यांचे मार्गदर्शनामुळे शाळेनी प्रगती केलेली आहे.
. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात केलेली स्वच्छता, वर्गांची सजावट, परसबाग, वक्तृत्व, व सांस्कृतिक आणि क्रीडास्पर्धा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेले उपक्रम, यामुळे नाचनभट्टी या शाळेला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला असल्याचे मुख्याध्यापक लोखंडे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे या शाळेमधून आतापर्यंत १३ विद्यार्थी नवोदय विद्यालय साठी निवड झाले असून शिष्यवृत्ती या परीक्षेत सुद्धा शाळेचा सक्रिय सहभाग आहे.
. शाळेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक आला असल्याने गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, केंद्रप्रमुख सज्जन तेलकापल्लीवार, ग्राम पंचायत सरपंच विद्या खोब्रागडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज हनवते,यांचेसह गावातील असंख्य नागरिकांनी शाळेचे अभिनंदन केले आहे.


