Home सामाजिक माना जमातीच्या सर्वांगीण विकासात संस्थेचे योगदान मोलाचे : आमदार प्रतिभा धानोरकर

माना जमातीच्या सर्वांगीण विकासात संस्थेचे योगदान मोलाचे : आमदार प्रतिभा धानोरकर

1193

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंताचा सत्कार

माना जमातीचा वरोरा येथे भव्य कार्यक्रम

वरोरा : माना जमातीचे वतीने वरोरा व भद्रावती तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंताचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आला.

.         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माना जमातीचे अभ्यासक तथा शेतकरी नेते ॲड.नारायणराव जांभुळे, नागपूर होते. सत्कार समारंभाचे उद्घाटन वरोरा भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे हस्ते पार पडले. त्याप्रसंगी मंचावर सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, प्रमोद मगरे, देविदास जांभूळे, राहुल दडमल, राजीव दोडके, दामोदर दोहतरे, रमेश मानकर, संजय गायकवाड, यशवंत वाघ, अनिल चौधरी,राजू चिकटे ,परसराम नन्नावरे, बाळासाहेब पडवे इ. उपस्थित होते.

.         आदिवासी माना जमात विकास संस्था वरोराचे वतीने जमातीतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी दरवर्षी वर्ग १० व १२ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. सन २०२३ मध्ये वर्ग १० व १२ चे परीक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी IIT, NEET, JEE, CET, क्रीडा व इतर, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सोसायटी व बाजार समिती पदाधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, कर्तृत्ववान महिला, शेतकरी कंपनी, आदर्श शेतकरी, बचत गट, माजी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी इत्यादी क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये मनीष भारत श्रीरामे, प्रथमेश जनार्धन घरत, आदित्य संजू जांभुळे, सुशांत दिलीप गराटे, वल्लभ रवींद्र काळमेघ, प्रांजली दामोदर दोहतरे, अनुश्री विनोद दडमल, सुयश भोजराज दडमल इत्यादींचा समावेश आहे. नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी संदीप चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला.

.         कार्यक्रमांप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा उत्तम कामगिरी बाबत जमातीचे वतीने सत्कार करण्यात आला. जमातीचे विकासात विशेष योगदान दिल्याबद्दल बसंत सिंग व प्रमोद मगरे यांचाही सत्कार करण्यात आला. त्यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करताना संस्थेच्या कार्याचे कौतुक करीत माना जमातीच्या सर्वांगीण विकासात संस्थेचे योगदान फार मोलाचे आहे. भविष्यात माना जमातीने प्रत्येक क्षेत्रात भरीव कामगिरी साधावी यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासित केले. अध्यक्षीय भाषणातून ॲड.नारायणराव जांभुळे यांनी माना जमातीने शिक्षण, संघटन व विकास या त्रिसूत्रीचा अवलंब करून संस्थेच्या माध्यमातून वरोरा भद्रावती तालुक्यातील जमातीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नियोजनबद्ध सुरू असलेल्या कामाची प्रशंशा केली. आदिवासी माना जमातीचे कायदेशीर व न्यायालयीन प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी राहुल दडमल, राजू दोडके यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

.         प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष अरुण चौधरी यांनी कार्यक्रमाचा उद्देश व प्रस्तावना मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव संजू जांभूळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष चौखे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील गावागावातून महिला विद्यार्थी, जमात बांधव, लोक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वरोरा तालुका आदिवासी माना जमात विकास संस्था वरोरा, वधू वर सूचक मंडळ भद्रावती आणि वरोरा व भद्रावती येथील जमात कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!