जिल्ह्यातील 42 संघांचा सहभाग
भद्रावती : भद्रावती येथील प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सोमवारला प्रशिक्षण संस्थेच्या मैदानावर जिल्हास्तरीय शासकीय तथा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे16, संघ, कबड्डी16तर व्हॉलीबॉलचे10 सघ असे एकूण 42 संघ जिल्ह्यातील शासकीय व अशासकीय प्रशिक्षण संस्थेचे सहभागी झाले आहे.
. सदर क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी यरमे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रियदर्शनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संचालक तथा इंटक नेते धनंजय गुंडावार, डॉक्टर यशवंत घुमे, माजी न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, पत्रकार सुनील बिपटे, साई आयटीआय चंद्रपूरचे संजय भाकरे, सोनाली गुंडावार, प्राचार्य प्रवीण बाळसराफ आदी मान्यवर उपस्थित होते. आजच्या काळात सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण हे महत्त्वाचे ठरत असून या अभ्यासक्रमातून त्यांना हमखास रोजगार उपलब्ध होत असतो असे मत धनंजय गुंडावर यांनी व्यक्त केले व विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. उद्घाटनपर कार्यक्रमाला प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक वृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


