Home विदर्भ उपमुख्यमंत्री फडणवीस व वनमंत्री मुनगंटीवार यांना जिवे मारण्याची धमकी

उपमुख्यमंत्री फडणवीस व वनमंत्री मुनगंटीवार यांना जिवे मारण्याची धमकी

1195

व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल : आरोपी विरुद्ध गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

चंद्रपूर

.        राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना एका माथेफिरूने अश्लील, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसेच कापून टाकण्याची धमकी देणारा ४ मिनिटे ४७ सेकंदाचा व्हिडीओ बनवून तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मुनगंटीवार यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी बल्लारपूर येथील भाजप कामगार मोर्चाचे विदर्भ उपाध्यक्ष रामदास दुर्योधन यांनी गडचांदूर पोलिसात रीतसर तक्रार दाखल केली. याप्रकरणी बाबाराव मस्की, रा. गडचांदूर, ता. कोरपना याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविच्या कलम २९४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बाबाराव मस्की हा भारत राष्ट्र समितीचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

.        व्हायरल व्हिडीओ बघितला असता आरोपी बाबाराव मस्की याने हा व्हिडीओ नियोजनबद्धरीतीने तयार केल्याचे दिसून येते. यामध्ये सुरुवातीला त्याची पत्नी शोभा मस्की या दिसतात.

.        नंतर बाबाराव मस्की हा सुधीर मुनगंटीवार यांना आणि नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करीत असल्याचे दिसून येते. पदाधिकाऱ्यांना लक्षात येताच कमालीचा रोष निर्माण झाला. याप्रकरणी लगेच भाजप कामगार मोर्चाचे विदर्भ उपाध्यक्ष रामदास दुर्योधन यांनी गडचांदूर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तसेच शांतता टिकून राहावी, यासाठी बाबाराव मस्की याला अटक करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, कामगार आघाडी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष संदीप पारखी, अनुसूचित जाती मोर्चा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जिवणे, प्रमोद लांडे, संजय जयपुलकर, संतोष तेलिवार यांनी तक्रार दाखल करून केली.

error: Content is protected !!