सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव रत्नाकर चटप, बाळकृष्ण काकडे यांच्या आमरण उपोषणाला यश
नांदाफाटा
. कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आवाळपूर अंतर्गत असलेल्या दत्तक गावातील दहा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी कंपनी विरोधात 13 नोव्हेंबरपासून धरणे आंदोलन व बेमुदत साखळी उपोषण केले. अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जिल्हा सचिव तथा ग्रामपंचायत नांदाचे सदस्य रत्नाकर चटप व आवाळपूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी १६ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले. तब्बल तीन दिवसानंतर आंदोलनाची धार तीव्र झाली असताना गावातील व्यापारीमंडळ विविध पक्ष, सामाजिक संघटना व गावकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अल्ट्राटेक कंपणी प्रशासन नरमले.
. कंपनी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत सरपंच संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. शिष्टमंडळात नांदा गावचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, बाखर्डीचे सरपंच अरुण रागीट, हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे, सांगोडाचे माजी सरपंच सचिन बोंडे, चंदू राऊत,प्रमोद वाघाडे उपस्थित होते. सरपंच संघटनेच्या मागण्यांची भूमिका स्पष्ट कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी पत्र दिले. काल (ता.१८) रात्री १० वाजता अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे उपव्यवस्थापक नारायणदत्त तिवारी व सतीश मिश्रा यांनी उपोषणकर्ते रत्नाकर चटप व बाळकृष्ण काकडे यांना लिंबू पाणी पाजून लेखी पत्र देत आमरण उपोषण सोडवले. नांदा, बिबी, आवाळपूर, हिरापूर, सांगोडा, भोयगाव, बाखर्डी, तळोधी, नोकारी, पालगाव या गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

