Home सामाजिक चंद्रपूरच्या ‘वाघ्या हळदी’ला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक

चंद्रपूरच्या ‘वाघ्या हळदी’ला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक

16

जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी थेट संवाद

वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे हळद उत्पादक मेळावा

भौगोलिक मानांकन व आधुनिक यंत्रसामग्री देण्याचे आश्वासन

वरोरा : लभान सराड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, खांबाडा (ता. वरोरा) यांच्या पुढाकाराने आयोजित हळद उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यात जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक ‘वाघ्या हळदी’ला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 वाघ्या हळदीची वैशिष्ट्ये व जीआय टॅगसाठी प्रयत्न

मेळाव्यात बोलताना जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी येथील हळदीची वैशिष्ट्ये अधोरेखित केली. इतर हळदीच्या तुलनेत चंद्रपूरच्या हळदीमध्ये ७.५ ते ८ टक्के उच्च दर्जाचे कर्क्युमिन (Curcumin) आढळते. ही उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मोठी संभाव्यता लक्षात घेता, या हळदीला स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. यासाठी आवश्यक कागदपत्रे, संशोधन, नमुना संकलन आणि संस्थात्मक प्रयत्न केले जातील.

बांधावर चर्चा आणि आधुनिक यंत्रांचे आश्वासन

या मेळाव्यात हळद लागवड, पेरणी व्यवस्थापन, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन तसेच विक्रीसंदर्भातील विविध समस्या व संधी यांवर शेतकऱ्यांच्या बांधावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शन केले. तसेच हळद लागवड आणि काढणीसाठी लागणारी आधुनिक यंत्रे व औजारे शेतकरी उत्पादक कंपनीला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

बोडखा आणि बारव्हा येथे कृषी उपक्रमांची पाहणी

मेळाव्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी लभान सराड येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन तेथील बायोचार युनिट व गांडूळ खत युनिटची पाहणी केली. यासोबतच त्यांनी मौजा बोडखा आणि आदर्श गाव बारव्हा येथे प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उपक्रमांची पाहणी केली. बारव्हा येथे महिला बचत गटांशी चर्चा करून कृषी प्रात्यक्षिकेही त्यांनी पाहिली.

.           “स्थानिक वाघ्या हळदीपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत” हा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासन, एफपीसी आणि शेतकरी यांचे संयुक्त प्रयत्न पुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, तहसीलदार योगेश कौटकर, प्रकल्प संचालक कुसळकर, लभान सराड एफपीसीचे संचालक मंडळ आणि मोठ्या संख्येने हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

error: Content is protected !!