विविध सामाजिक उपक्रमांची केली पाहणी
प्रकल्पातील नागरिक व लाभार्थ्यांशी साधला संवाद
स्वावलंबन आणि पुनर्वसन कार्याचे केले कौतुक
वरोरा : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी (दि. ६) वरोरा येथील प्रसिद्ध आनंदवन प्रकल्पास सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रकल्पात राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विकासात्मक उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच आनंदवनचे प्रमुख विकास आमटे यांच्याशी प्रकल्पाची कार्यपद्धती आणि भावी विकासात्मक बाबींवर सविस्तर चर्चा केली.
. दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी आनंदवनमधील रुग्णालय, निवासी वसाहत, भोजनगृह, बायोगॅस प्रकल्प आणि तलाव सिंचन योजनेची पाहणी केली. यासोबतच त्यांनी समाधी स्थळ, स्मशानभूमी व्यवस्थापन, निजबल प्रकल्प, संधीनिकेतन प्रकल्प, अंगणवाडी, स्वरानंदवन प्रकल्प आणि विविध उत्पादन व कौशल्य विकास कार्यशाळांनाही भेटी दिल्या. या सर्व उपक्रमांचे नियोजन आणि लाभार्थी केंद्रित व्यवस्थापन पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
. जिल्हाधिकारी पंत यांनी प्रकल्पातील नागरिक, रुग्ण आणि लाभार्थ्यांशी अत्यंत संवेदनशीलतेने संवाद साधून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. समाजात वंचित आणि विशेष गरजा असलेल्या घटकांच्या जीवनमान उन्नतीसाठी आनंदवनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. स्वावलंबन, पुनर्वसन, कौशल्य विकास आणि सामाजिक समावेशकतेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या आदर्श कार्यपद्धतीची जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दखल घेतली.


