बदलत्या काळातील तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींवर प्रकाश
‘स्व. माजी खासदार सुरेश धानोरकर स्मृती शिष्यवृत्ती’चा लाभ घेण्याचे मानस धानोरकर यांचे आवाहन
चंद्रपूर : बेंगळुरू येथील नामांकित ‘कोशिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ च्या वतीने चंद्रपूर येथील ‘ग्रँड आयकॉन हॉटेल’ येथे बुधवार, ३ जून रोजी अभियांत्रिकी प्रवेश, करिअर मार्गदर्शन आणि शिष्यवृत्ती माहिती मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला चंद्रपूर व परिसरातील शिक्षणतज्ज्ञ, शालेय संस्थाचालक, विद्यार्थी, पालक आणि करिअर समुपदेशकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींवर मार्गदर्शन
बदलत्या काळातील आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांमधील रोजगाराच्या व उच्च शिक्षणाच्या संधींबद्दल पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट होते. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमधील भविष्यातील करिअरच्या सुवर्णसंधींवर सविस्तर प्रकाश टाकण्यात आला.
‘स्व. माजी खासदार सुरेश धानोरकर स्मृती शिष्यवृत्ती’ योजना
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक अडचण भासू नये, या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या “श्री सुरेश धानोरकर मेमोरियल स्कॉलरशिप” या विशेष शिष्यवृत्ती योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर आणि मानस धानोरकर यांनी केले आहे. उच्च तांत्रिक शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या हुशार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा मोठा आधार मिळणार आहे. मेळाव्यात संस्थेच्या प्रतिनिधींनी या शिष्यवृत्तीची पात्रता, निकष, अर्ज प्रक्रिया आणि मिळणारे लाभ याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
थेट संवाद आणि करिअर कौन्सिलिंग
मेळाव्यादरम्यान ‘कोशिस इन्स्टिट्यूट’च्या प्रतिनिधींनी पालक आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून संस्थेचा उद्योग-केंद्रित अभ्यासक्रम, इंटर्नशिपच्या संधी, उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड, कॅम्पसच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि हॉस्टेल सुविधा याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक करिअर कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
. या मेळाव्याला मानस धानोरकर, सुग्रेश स्वामी (मॅनेजमेंट), सुधीर गौतम, स्थानिक नगरसेवक व इतर अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.


