Home सामाजिक वासेरा येथे विविध संघटनांचा ” एक दिवस स्वच्छतेसाठी” उपक्रम

वासेरा येथे विविध संघटनांचा ” एक दिवस स्वच्छतेसाठी” उपक्रम

1247

सिंदेवाही 

.            स्वच्छतेतून समृद्धीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन स्वच्छ गाव, सुंदर गाव, करण्यासाठी उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी पहाटेपासून नागरिकांचा देण्यात येणारा खडा पहारा यांपासून सुरू झालेली मोहीम आता एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम घेऊन गावातील काही विविध संघटना काम करीत असल्याचे चित्र सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथे पहावयास मिळत असून नुकताच श्रीराम मोहल्ला बारीक तांदूळ या संघटनेने गावातील विविध स्थळे साफ सफाई करून एक दिवस स्वच्छतेसाठी” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे दिसून येत आहे.

.            स्वच्छता हा एक महत्त्वपूर्ण विषय आहे. ज्याची गंभीरता आज प्रत्येक नागरिकांनी मानली आहे. स्वच्छता ही स्वस्थ आणि समृद्ध समाजाची मौल्यवान गुणवत्ता आहे. स्वच्छतेचे महत्व आपल्या आरोग्यासाठी, वातावरणासाठी, स्वास्थ्यासाठी, आणि देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. स्वच्छता मोहीम ही केवळ सरकारने ठरवले म्हणून त्यासंदर्भातील उद्दीष्टपूर्ती नाही. तर मानवी जीवनातील ही अविभाज्य गरज बनली आहे. स्वच्छता ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी नागरिकांचे प्रबोधन करून त्यांच्यात जाणीवजागृती निर्माण करणे काळाची गरज आहे. दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील वासेरा ग्राम पंचायतचे युवा सरपंच महेश बोरकर यांचे पुढाकारात मागील वर्षीपासून उघड्यावर बसणाऱ्या नागरिकांना रोखण्यासाठी गावातील काही सुज्ञ नागरिक पहाटे चार वाजता पासून गावच्या सभोवताल खडा पहारा देऊन त्यांना घरीच शौचालयात बसण्यासाठी जागृती करीत असताना एक तास स्वच्छतेसाठी ही संकल्पना घेऊन गावातीलच गौरी शारदा महिला मंडळाच्या वतीने आठवड्यातून एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम सुरू केला. तर बौद्ध समाज नगर कमिटी येथील युवकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर स्वच्छ करून गावातील स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच महेश बोरकर आणि पोलीस पाटील देवेंद्र तलांडे, या युवा जोडीने स्वतः हातात झाडू घेऊन गावातील काही परिसर स्वच्छ करून नागरिकांना आपापला परिसर स्वच्छ करण्याचा संदेश दिला. तर श्रीराम मोहल्ला बारीक तांदूळ ही नव्यानेच तयार झालेली युवकांची संघटना गायमुख देवस्थान परिसर स्वच्छ करून नुकताच गावाचा दर्शनी भाग असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक, हा परिसर स्वच्छ करून एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभाग नोंदविला. त्यामुळें वासेरा गावातील अनेक नागरिकांच्या मनात स्वच्छतेबाबत चैतन्य निर्माण झाले असून अनेक संघटना पुढे येत असल्याने सरपंच महेश बोरकर यांनी गावातील महिला बचत गट, शेतकरी बचत गट, सामाजिक संघटना यांनी एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभागी होऊन गावाला स्वच्छतेच्या बाबतीत तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवावा , असे आवाहन करून नागरिकांनी गावासाठी केलेल्या सहकार्याचे आभार व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!