Home चंद्रपुर जिल्हा विशेष वरोरा नगरपरिषदेत सत्ताधारी नगरसेवकाचाच ‘कचरा फेको’ आंदोलन

वरोरा नगरपरिषदेत सत्ताधारी नगरसेवकाचाच ‘कचरा फेको’ आंदोलन

14

मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर घाणीचे साम्राज्य

प्रभाग ७ मधील नालेसफाईच्या मुद्द्यावरून राज खंडारे आक्रमक

भर पावसात नागरिकांच्या घरात शिरली होती घाण

वरोरा : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील स्वच्छतेचा प्रश्न निकाली काढण्यात नगरपरिषद प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याने, शुक्रवारी एका सत्ताधारी नगरसेवकानेच आक्रमक पवित्रा घेत नगर परिषद प्रशासनाला हादरवून सोडले. काँग्रेसचे नगरसेवक राज खंडारे यांनी थेट मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांच्या कक्षाबाहेर कचरा आणि घाण फेकून प्रशासनाचा निषेध केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अर्ध्या तासाच्या पावसाने उडविली दाणादाण
७ मे रोजी वरोऱ्यात अवघ्या अर्ध्या तासाचा पाऊस झाला. मात्र, प्रभाग ७ मधील नाल्या आधीच तुंबलेल्या असल्याने नाल्यांमधील सर्व घाण आणि कचरा थेट नागरिकांच्या घरात शिरला. गेल्या अनेक दिवसांपासून या नाल्यांच्या सफाईसाठी नगरसेवक राज खंडारे यांनी नगरपरिषदेच्या सभागृहात वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने अखेर नागरिकांच्या संतापाचा बांध फुटला.

भर कार्यालयात पसरली दुर्गंधी
प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या नगरसेवक राज खंडारे यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रभागातील नागरिकांसह नगरपरिषद कार्यालय गाठले. संतापलेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या दालनाबाहेर कचरा आणून टाकला. काही क्षणातच संपूर्ण पालिका परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली, ज्यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली.

प्रशासनाकडून पोलिसांत धाव
या घटनेनंतर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती, परिणामी कार्यालयातील कचऱ्याचा ढिगारा बराच वेळ तसाच पडून होता.

आपल्याच सत्तेत लोकप्रतिनिधीवर रस्त्यावर येण्याची वेळ
वरोरा नगरपरिषदेत काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाच्याच नगरसेवकाला आपल्या कामासाठी अशा प्रकारे टोकाचे आंदोलन करावे लागल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. निधीची कमतरता आणि प्रशासकीय दिरंगाई यामुळे शहराचे आरोग्य धोक्यात आल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. आता या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येते का आणि प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न सुटतो का, याकडे वरोरावासीयांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!