बंद होणाऱ्या शाळेचे नावलौकीक
हर्ष चौधरी व मंथन गेडाम ने गाठली प्राविण्य श्रेणी
बल्लारपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ मध्ये घेण्यात आली. या परीक्षेचा आनलाईन निकाल शुक्रवार (दि. ८) मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाने एकेकाळी पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाचा कुटील डाव हाणून पाडला होता. त्या जिल्हा परिषद हायस्कूलने नावलौकीक वाढवून दहावीच्या निकालात भरारी घेतली. येथील विद्यार्थी हर्ष सुनिल चौधरी व मंथन अविनाश गेडाम याने प्राविण्य श्रेणी गाठून यश संपादन केले. बल्लारपूर तालुक्यातील विसापूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलचा दहावीचा निकाल पहिल्यांदाच शंभर टक्के लागला आहे.
. विसापूर जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये शैक्षणिक सत्र 2022- 23 मध्ये वर्ग ५ ते १0 चे केवळ 23 विद्यार्थी शिक्षण घेत होते. तेव्हा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पटसंख्या कमी असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद हायस्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय विसापूरकरांच्या जिव्हारी लागला होता. जिल्हा परिषद हायस्कूल आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची म्हणत जिल्हा परिषदेवर शिक्षक दिनी मोर्चा काढला होता. त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला शाळा सुरु ठेवण्यासाठी एक संधी देण्याचा आग्रह अधिकाऱ्यांकडे धरला होता. या संधीचे सोने झाल्याचे आज जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात उमटले आहे.
. विशेष म्हणजे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपली मुले इतर शाळेतून काढून जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये प्रवेश घेऊन पटसंख्या वाढीसाठी हातभार लावला होता.
. यावर्षी जिल्हा परिषद हायस्कूल, विसापूर चा दहावीचा निकाल पहिल्यांदाच शंभर टक्के लागला आहे. येथील दहावीचे विद्यार्थी हर्ष सुनिल चौधरी ७९.१0 टक्के गुण प्राप्त करून प्रथम आला आहे. मंथन अविनाश गेडाम याने ७६.४0 टक्के गुण मिळवून दुसरा आला आहे. तर मानसी गंगाधर तलांडे हिने 73.20 टक्के गुणासह तिसरी आली आहे.येथील दहावीच्या निकालात प्राविण्य श्रेणीत दोन,प्रथम श्रेणीत सहा,द्वितीय श्रेणीत अकरा, तर पास श्रेणीत एक असे एकूण २0 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले. यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेला शंभर टक्के निकाल दिला. या निकालाबद्दल मुख्याध्यापक अरविंद चौधरी, शिक्षक दिनेश वरघणे,शैलेश बरडे,संजय उईके,अजय ठाकरे,संगीता घोडेस्वार, प्रांजली करडभूजे,खान,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनिल चौधरी आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.
” विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलवर एकेकाळी अवकळा आली होती. या शाळेत पाचवी पासून दहावी पर्यंत केवळ तेवीस विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत होते. परिणामी जिल्हा परिषद प्रशासनाने शाळाच पटसंख्या कमी आहे, म्हणून बंद करण्याचा फतवा काढला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने आम्हाला पटसंख्या वाढीसाठी संधी दिली. यामुळे आजघडीला येथील शाळेत दोनशे विद्यार्थी विद्यार्जन करत असून दहावीचा यंदा निकाल शतप्रतिशत लागल्याने गावकऱ्यांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे परिश्रमाचे फलित आहे. अनेकश्वर मेश्राम, उपसरपंच, विसापूर. “


