Home सामाजिक चिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र देशात रोजगाराचा नवा ‘आदर्श’ ठरेल

चिचपल्लीचे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र देशात रोजगाराचा नवा ‘आदर्श’ ठरेल

9

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

३७ ‘बांबू सखीं’ना टूलकिट व विद्यावेतन वितरण

चंद्रपुरात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू

चंद्रपूर : “देशाचे गौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेतून प्रत्येक कुटुंब सक्षम आणि सशक्त व्हावे, यासाठी अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. याच संकल्पनेला पूरक ठरत असलेले चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (BRTC) हे केवळ प्रशिक्षणाचे केंद्र न राहता, भविष्यात ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर बनवणारे आणि देशातील रोजगारनिर्मितीचे एक सर्वोत्तम आदर्श केंद्र ठरेल,” असा ठाम विश्वास राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

.       चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (BRTC) कॅम्पा सन २०२५-२६ अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त बांबू कारागीर महिलांसाठी आयोजित ‘उपजीविका टूलकिट वितरण’ कार्यक्रमात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

महिलांच्या कौशल्याचे कौतुक आणि सन्मान
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार मुनगंटीवार यांनी प्रशिक्षणार्थी महिलांनी बांबूपासून अत्यंत कल्पकतेने तयार केलेल्या विविध आकर्षक आणि उपयुक्त वस्तूंची बारकाईने पाहणी केली. या महिलांच्या हातातील कला पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी कॅम्पा २०२५-२६ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘यशोगाथा’ या प्रशिक्षण माहिती पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘बांबू सखीं’चा यावेळी शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

३७ महिलांना साधनसामग्री आणि विद्यावेतन प्रदान
वरवट, घुग्घूस, चिचपल्ली, मोहर्ली, चोरगाव आणि निंबाळा येथील एकूण ३७ महिला बांबू सखींना त्यांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘उपजीविका टूलकिट’चे वितरण आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान महिलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रति दिवस १५० रुपये दराने दोन टप्प्यांत देण्यात येणाऱ्या विद्यावेतनाचे (Stipend) धनादेशही यावेळी प्रदान करण्यात आले. या उपक्रमामुळे महिलांच्या हाताला स्थानिक पातळीवर काम मिळून त्यांना स्वावलंबी होण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि कौशल्य वृद्धी
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार मुनगंटीवार म्हणाले की, “चंद्रपूर जिल्हा विकासाच्या वेगाने पुढे जात असताना समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः ग्रामीण महिलांना सोबत घेऊन जाणे आमचे कर्तव्य आहे. एक वर्ग आर्थिकदृष्ट्या सक्षम असताना दुसरा वर्ग रोजीरोटीसाठी संघर्ष करत असेल, तर तो विकास अपूर्ण आहे. म्हणूनच वनमंत्री म्हणून कार्य करताना आम्ही डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वनधन योजना सुरू केली. वन अकादमीची स्थापना आणि ताडोबाला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले.”

आगामी भव्य प्रकल्प : SNDT उपकेंद्र आणि कौशल्य विकास केंद्रे
जिल्ह्यातील महिलांच्या भविष्यासाठी आखलेल्या योजनांबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, “महिलांना शिक्षणासोबतच व्यावसायिक कौशल्यात पारंगत करण्यासाठी ५० एकरमध्ये एस.एन.डी.टी. (SNDT) विद्यापीठाचे भव्य उपकेंद्र साकारले जात आहे, जिथे ६२ प्रकारचे कोर्सेस उपलब्ध असतील. याशिवाय बल्लारपूर येथे स्व. सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र आणि अजयपूर येथे पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभे राहत आहे.”

‘बांबू सखी’ ही एक ज्योत आहे!
“येथील प्रत्येक बांबू सखी ही एक ज्योत आहे; या एका ज्योतीतून आपल्याला हजारो ज्योती प्रज्वलित करायच्या आहेत. आजवर ६५० महिलांनी येथे प्रशिक्षण घेतले असून भविष्यात हजारो महिलांच्या हाताला काम देण्याची क्षमता या केंद्रात आहे. येथील महिला उद्याच्या यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतील,” असे सांगत त्यांनी केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे विशेष कौतुक केले.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वन अकादमीचे संचालक आर. रामानुजम, वाहतूक व विपणन विभागाचे उपवनसंरक्षक विशाल माळी, उपवनसंरक्षक (मध्यचांदा) योगेश वाघाये, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार, विभागीय वन अधिकारी राजन तलमले, वन अकादमीच्या अपर संचालक मनीषा भिंगे आदी वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

error: Content is protected !!