मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा दिलासा
देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती
राज्यात वर्षभरात ३३३ कोटींचे वाटप
चंद्रपूर : शासकीय योजनांपासून वंचित राहिलेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ संजीवनी ठरत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून या निधीच्या कार्यपद्धतीत मोठे बदल करण्यात आले असून, चंद्रपूर जिल्ह्यातील १०५ रुग्णांना या आर्थिक वर्षात सुमारे ८९ लाख ३३ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे.
२० गंभीर आजारांसाठी मदतीचे कवच
या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल २० प्रकारच्या गंभीर आजारांचा आणि शस्त्रक्रियांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये २ ते ६ वयोगटातील मुलांसाठी अत्यंत महागडी अशी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया, हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हात व गुडघा प्रत्यारोपण आणि हिप रिप्लेसमेंट यांसारख्या मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. याशिवाय कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी व रेडिएशन, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायलिसिस, अस्थिबंधन आणि नवजात शिशुंचे आजार यांसाठीही आर्थिक कवच दिले जाते. विशेषतः रस्ते अपघात, विद्युत अपघात आणि भाजलेले (बर्न) रुग्ण यांना या निधीतून तातडीने आधार दिला जात आहे.
पारदर्शक आणि पेपरलेस कार्यपद्धती
जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया ‘पेपरलेस’ केल्यामुळे मदतीचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. अर्जांचा तातडीने निपटारा आणि थेट रुग्णालयांना निधीचे वितरण यामुळे पारदर्शकता आली आहे. केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहता सामंजस्य करार, क्राउड फंडिंग आणि धर्मादाय संस्थांच्या माध्यमातून मदत पोहचवली जात आहे.
बालकांच्या कर्करोग उपचारासाठी विशेष करार
कर्करोगग्रस्त बालकांना गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात विशेष सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (CSR) निधीतून बालकांच्या कर्करोग उपचारासाठी मोठा निधी उपलब्ध होणार असून, गरीब कुटुंबांतील मुलांच्या उपचाराचा मार्ग सुलभ झाला आहे.
राज्यातील आणि जिल्ह्यातील मदतीचा लेखाजोखा
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्यातील ४० हजार ७७६ रुग्णांना एकूण ३३३ कोटी ६ लाख ८१ हजार ५०० रुपयांची मदत देण्यात आली आहे. याच प्रवाहात चंद्रपूर जिल्ह्यातील १०५ गरजू रुग्णांना ८९.३३ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळाल्याने ही योजना अनेक कुटुंबांसाठी आधारवड ठरली आहे.
येथे साधा संपर्क
गरजू रुग्णांनी मदतीसाठी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


