Home सामाजिक दर्जेदार विद्यार्थी घडवणे ही आपली नैतिक जबाबदारी

दर्जेदार विद्यार्थी घडवणे ही आपली नैतिक जबाबदारी

5

संविधान नसते तर मी आज तुमच्यासमोर नसतो – पालकमंत्री डॉ. अशोक उईके

जिल्हा परिषद चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि आधुनिक शिक्षणावर भर

चंद्रपूर : “विद्यार्थी हा आपला केंद्रबिंदू असून शिक्षण केवळ नोकरी मिळवण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवण्यासाठी आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे,” असे भावनिक प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

.      यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या प्रकल्प संचालक मंजिरी टकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी केळकर यांच्यासह मंचावर पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत उन्नती वडसकर, फाल्गुनी पोतराजे आणि गायत्री बांदुरकर या विद्यार्थिनींना सुद्धा मानाचे स्थान देण्यात आले..

शिक्षणाचे महत्त्व आणि वैयक्तिक आठवणी
पालकमंत्री डॉ. उईके यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यांचे पाचवीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे. ते म्हणाले की, “विद्यार्थ्यांमध्ये भावनिक आणि आध्यात्मिक बुद्धिमत्ता निर्माण होणे गरजेचे आहे. कठीण प्रसंगात निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी. जर आपण दर्जेदार विद्यार्थी घडवले तरच देशाचे भविष्य उज्वल होईल.”

स्त्री शक्ती आणि प्रशासनाचे कौतुक
जिल्ह्याला पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून वसुमना पंत लाभल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मंत्री महोदय म्हणाले की, “स्त्री केवळ शक्ती नाही, तर परिवर्तनाची ऊर्जा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नक्कीच चांगले बदल घडतील.” तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या कल्पकतेमुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रशासकीय प्रगती आणि आधुनिक उपक्रम
जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी माहिती दिली की, गेल्या सात-आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या ‘निपुण’ उपक्रमात चंद्रपूर जिल्ह्याने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमध्ये आता ‘रोबोटिक्स’ उपक्रम राबविला जात असून ‘ई-चावडी वाचन’ सारखे आधुनिक उपक्रम विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सुरू आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्राचे वाटप : जिल्हा परिषदेमार्फत पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आला. या स्पर्धेचे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण पालकमंत्री अशोक वुईके यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यात प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक संस्कार कारेकर, द्वितीय स्वराज नन्नावरे, तृतीय क्रमांक नैतिक कुचनकर यांनी प्राप्त केला. चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक पूर्वी केळझरकर, द्वितीय दिव्या आरकिनवार, तृतीय श्रेयस मराठे यांनी, निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मानसी ढूमने, द्वितीय अपेक्षा बेताल, तृतीय गायत्री बांदुरकर यांनी, वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रांजली आवारी, द्वितीय माही वासेकर, तृतीय कनिष्क कांबळे यांनी तर चावडी वाचन स्पर्धेत प्रथम क्रमांक देवांश परतेकी, द्वितीय ईश्वरी मोहुर्ले आणि तृतीय क्रमोक सोमानी गोरे यांनी प्राप्त केला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

.     कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर यांनी केले, संचालन एकता बंडावर यांनी तर आभार प्रदर्शन विनीत मत्ते यांनी मानले. या सोहळ्याला मोठ्या संख्येने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

error: Content is protected !!