नगरसेविका किरण कोतपल्लीवार यांचे पंकजा मुंडेंना पत्र
दोन वर्षांनंतरही काम अपूर्णच
नदीकाठच्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
तातडीने हस्तक्षेपाची मागणी
चंद्रपूर : शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने आता नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विठ्ठल मंदिर प्रभागाच्या नगरसेविका किरण सचिन कोतपल्लीवार यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे.
. इरई नदीची सरासरी रुंदी सुमारे २०० मीटर असताना केवळ ८० मीटर भागाचेच खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या अनेक काठांवरील काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे. या अर्धवट कामामुळे पावसाळ्यात नदीच्या पाण्याचा प्रवाह विस्कळीत होतो आणि हे पाणी विठ्ठल मंदिर प्रभागातील सखल वस्त्यांमध्ये शिरते. यामुळे दरवर्षी रहिवाशांचे मोठे नुकसान होत असून जीवितहानीचा धोकाही वाढला आहे.
काय आहेत प्रमुख मागण्या ?
नगरसेविका किरण कोतपल्लीवार यांनी पत्रात नमूद केले आहे की, जर संपूर्ण २०० मीटर क्षेत्राचे समान खोलीकरण झाले नाही, तर भविष्यात पूरस्थिती अधिक भयावह होऊ शकते. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रशासनाने उर्वरित भागाचे खोलीकरण युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
. पावसाळा तोंडावर असल्याने, शासनाने या पत्राची दखल घेऊन कामाला गती न दिल्यास आगामी काळात नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


