भद्रावतीच्या तरुणीची धाडसी तक्रार, थेट कारवाई !
नारायणी मोघेच्या जागरूकतेमुळे वैध मापन शास्त्र विभागाकडून दुकानावर जप्तीची कारवाई
‘ग्राहक पंचायत’च्या पुढाकाराला यश
भद्रावती : शहरातील गुरुनगर येथील रहिवासी आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूरची विद्यार्थिनी नारायणी मोघे हिने दाखवलेल्या ग्राहक जागरूकतेमुळे एका मनमानी करणाऱ्या दुकानदारावर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. छापील किमतीपेक्षा (MRP) जास्त पैसे उकळणाऱ्या दुकानदाराविरुद्ध नारायणीने दिलेला लढा इतर ग्राहकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
. मिळालेल्या माहितीनुसार, नारायणी आणि तिच्या मैत्रिणी छत्रपती नगर, बल्लारपूर बायपास येथील एका दुकानात थंड पेय खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी संबंधित दुकानदाराने शीतपेयावर छापील असलेल्या किमतीपेक्षा ५ रुपये जास्तीची मागणी केली. नारायणीने याला विरोध करत ‘कायद्यानुसार छापील किमतीपेक्षा जास्त पैसे घेता येत नाहीत’ असे दुकानदाराला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराने तिचे म्हणणे ऐकून न घेता उलट तिला अपमानास्पद वागणूक दिली आणि शीतपेय देण्यास नकार दिला.
. या अन्यायाविरुद्ध नारायणीने तातडीने ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती’ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांनी हे प्रकरण चंद्रपूरचे वैध मापन शास्त्र विभागाचे उपनियंत्रक जितेंद्र मोरे यांच्याकडे सोपवले. जितेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक डी.डी. दंडोरे यांनी संबंधित दुकानावर धाड टाकली. या कारवाईत अधिनियम २००९ व २०११, कलम १८(२) नुसार छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्याप्रकरणी मुद्देमाल जप्त करून दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.
. नारायणीच्या या धाडसामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावतीचे प्रवीण चिमूरकर, डॉ. ज्ञानेश हटवार, वतन लोने, भारत खोब्रागडे, करूना मोघे, सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे आणि प्रतिक्षा बनकर यांनी नारायणीच्या कृतीचे स्वागत केले असून, ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी नेहमी जागरूक राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा, असे आवाहन केले आहे.


