गडचिरोलीचा तस्कर अटकेत
चंद्रपुरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
ओडिशातून चंद्रपुरात पोहोचली होती अमली पदार्थांची खेप
२.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचे मुख्य कारण ठरत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गुरुवारी (२२ तारखेच्या) मध्यरात्री शहराच्या कुंदन प्लाझा चौकात सापळा रचून एका तस्कराला अटक केली. त्याच्याकडून ८ किलो १५ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला असून, या मुद्देमालाची किंमत २ लाख १० हजार रुपये इतकी आहे.
गुप्त माहितीने उघडले तपासाचे चक्र
चंद्रपूर शहरात परराज्यातून गांजाची मोठी खेप येणार असल्याची विश्वसनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. शहरात अमली पदार्थांचा शिरकाव होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने शहराच्या मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली.
मध्यरात्री २ वाजता हाय-व्होल्टेज ड्रामा
मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास, कुंदन प्लाझा चौकात तैनात असलेल्या पोलिसांना एक व्यक्ती संशयास्पद रित्या मोठी प्लास्टिकची पिशवी घेऊन येताना दिसली. पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला जागीच अडवले. त्याची झडती घेतली असता पिशवीत ८.१५ किलो वजनाचा ओला गांजा, पाने, फुले आणि बियांसह आढळून आला.
ओडिसा कनेक्शन उघड
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शहादेव ठाकूरदास मलिक (५३) असून तो मूळचा ठाकूरनगर, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे. सध्या तो चंद्रपुरातील राष्ट्रवादी नगर परिसरात वास्तव्यास होता. प्राथमिक चौकशीत त्याने हा गांजा ओडिसा राज्यातून तस्करी करून आणल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी गांजासह त्याचा मोबाईल फोनही जप्त केला असून, या तस्करीत आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
व्यसनाधीनतेवर पोलिसांचा प्रहार
चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीमागे अमली पदार्थांचे सेवन हे प्रमुख कारण असल्याचे पोलिसांचे मत आहे. दारूसोबतच आता तरुण पिढी गांजासारख्या अंमली पदार्थांच्या आहारी जात असल्याने, गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिसांनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे.
कारवाई करणारे पथक
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनील गौरकार, सुभाष गोहोकर, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी केली आहे. आरोपीवर NDPS कायद्याच्या कलम ८ (क) आणि २० (ब) (ii) (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


