समस्यांचा जागेवरच निपटारा
आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत ‘महाराजस्व’ शिबिर उत्साहात
विविध शासकीय योजनांची मिळाली माहिती
भद्रावती : शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तालुक्यातील घोडपेठ येथे शुक्रवारी ‘प्रशासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत ‘महाराजस्व शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामपातळीवरील महसुली प्रश्न आणि इतर प्रलंबित समस्यांचा तत्काळ निपटारा करण्यात आला, ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार करण देवतळे यांनी भूषवले. व्यासपीठावर उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जटाले, तहसीलदार राजेश भांडारकर, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी बालाजी कदम आणि दुय्यम निबंधक विजय झाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
एकाच छताखाली अनेक सुविधा
शिबिरात महसूल, कृषी, आरोग्य आणि सहकार अशा विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना सातबारा उतारे, उत्पन्न दाखले, नवीन शिधापत्रिका आणि इंदिरा गांधी योजनेचे लाभ देण्यात आले. विशेषतः महिलांसाठी असलेल्या ‘लखपती दीदी’ योजनेची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. अनेक क्लिष्ट कामे एकाच ठिकाणी पूर्ण झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
प्रशासन होणार अधिक लोकाभिमुख
याप्रसंगी बोलताना उपजिल्हाधिकारी अतुल जटाले म्हणाले की, “शासनाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करणे आणि प्रशासन पारदर्शक व लोकाभिमुख करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.” आमदार करण देवतळे यांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत जास्तीत जास्त नागरिकांनी अशा शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
. या शिबिरामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचला असून, प्रशासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र घोडपेठ येथे पाहायला मिळाले.


