Home सामाजिक वैद्यकीय पदवी म्हणजे केवळ कागद नाही, समाजाच्या आरोग्याची हमी – आ. सुधीर...

वैद्यकीय पदवी म्हणजे केवळ कागद नाही, समाजाच्या आरोग्याची हमी – आ. सुधीर मुनगंटीवार

10

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ उत्साहात 

पदवीदान सोहळ्यात मुनगंटीवारांनी जागवल्या कौटुंबिक आठवणी

चंद्रपूर : “वैद्यकीय क्षेत्रातील पदवी म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नसून ती समाजाच्या आरोग्याची मोठी जबाबदारी आहे. डॉक्टर हा समाजासाठी देवदूत असतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ आज सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला, त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा अभिमान
एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या सोहळ्यात विधिवत पदवीदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यशाचा आनंद आणि त्यांच्या पालकांच्या डोळ्यांत आपल्या पाल्याबद्दलचा अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता. हा सोहळा केवळ पदवी वितरण नसून विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ देणारा क्षण ठरला.

कौटुंबिक आठवणींनी मुनगंटीवार झाले भावूक
आपल्या भाषणात मुनगंटीवार यांनी स्वतःच्या आयुष्यातील वैयक्तिक अनुभव शेअर केले. ते म्हणाले, “माझी मुलगी एमबीबीएस झाल्यावर मी तिच्या पदवीदान समारंभाला गेलो होतो. त्या क्षणी जो आनंद मला झाला, तो अवर्णनीय होता. तोच आनंद आज मी येथे उपस्थित पालकांच्या चेहऱ्यावर अनुभवत आहे.” त्यांनी आपल्या कुटुंबातील वैद्यकीय वारशाचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांच्या परिवारात तब्बल १३ डॉक्टर आहेत. त्यांचे वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी १९६० साली एमबीबीएस पूर्ण केले होते. तसेच त्यांचे भाऊ नेत्ररोगतज्ज्ञ असून मुलगी व जावई रेडिओलॉजिस्ट आहेत. स्वतः डॉक्टर होऊ न शकल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आणीबाणीच्या काळात वडील तुरुंगात असल्याने ते वैद्यकीय शिक्षण घेऊ शकले नाहीत, मात्र गोंडवाना विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट देऊन तो मान पूर्ण केला.

तंत्रज्ञानासोबतच मानवी संवेदना जपण्याचे आवाहन
आधुनिक वैद्यकीय क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना मुनगंटीवार म्हणाले की, आज विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या (AI) युगात डॉक्टरांनी स्वतःला सतत अपडेट ठेवणे गरजेचे आहे. “तंत्रज्ञान कधीच डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, पण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणारा डॉक्टर निदानाच्या प्रक्रियेत मोठी प्रगती घडवू शकतो,” असे त्यांनी नमूद केले. टेलिमेडिसिन आणि रोबोटिक सर्जरी सारख्या नव्या संकल्पनांचा स्वीकार करून संवेदनशील आणि कुशल डॉक्टर म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

यावेळी त्यांनी एक काव्यपंक्ती सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली

“नई डगर है, नया सफर है, विज्ञान के साथ चलना होगा,
मशीनें तो बस जरिया है, पेशंट की धड़कनों को सुनना होगा।”

चंद्रपूरच्या प्रगतीचा संकल्प
चंद्रपूरमध्ये मेडिकल कॉलेज आणि कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, “चंद्रपूरचा ‘C’ हा कायम ‘Championship’ साठीच ओळखला जावा.” तसेच, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि SNDT महिला विद्यापीठाच्या ६२ अभ्यासक्रम केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला पद्मश्री व माजी खासदार डॉ. विकास महात्मे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. मंगेश गुलवाडे, उपअधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा आणि समाजसेवेची प्रेरणा देणारा एक संस्मरणीय सोहळा ठरला.

error: Content is protected !!