शेकडो नागरिकांनी घेतली मोफत आरोग्य तपासणी
केपीसीएल, बीसीएमपीएल आणि आरोग्य विभाग यांचा संयुक्त उपक्रम
उपसरपंच राजू डोंगे यांचा पुढाकार
भद्रावती : तालुक्यातील चेकबरांज येथे नागरिकांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) आणि बरांज कोल माईन्स (BCMPL) यांच्या संयुक्त विद्यमाने, प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगरगाव यांच्या सहकार्याने भव्य आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
. या शिबिरामध्ये प्रामुख्याने रक्तदाब (BP), मधुमेह (Sugar) आणि इतर महत्त्वाच्या शारीरिक व्याधींची तपासणी करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय आसुटकर, डॉ. जुलमे आणि मांगली आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने रुग्णांची तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला. कंपनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजानी यांनी या संपूर्ण वैद्यकीय उपक्रमाचे नियोजन चोखपणे पार पाडले.
. या शिबिराच्या आयोजनासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावतीचे सभापती तथा चेकबरांजचे उपसरपंच राजू डोंगे यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केपीसीएलचे मुख्य अभियंता रवींद्रजी भावी, बीसीएमपीएलचे उपाध्यक्ष जी. जिभकाटे, एचआर हेड सुभाष गोहोकार यांची उपस्थिती होती. यासोबतच रजनी मल्लया, विरेश बिजूर, संजीव भट्टाचार्य, आनंद राय, कानोबा दडमल, किशोर पुनवटकर, दिलीप पटेल आणि चंदन कुमार यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन दिले.
. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घराच्या जवळच मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आयोजक संस्था आणि राजू डोंगे यांचे आभार मानले आहेत.


