विद्यार्थ्यांनी स्वरचित कविता आणि भाषणांतून वाहिली भारतरत्न बाबासाहेबांना आदरांजली
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील पीएमश्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल कोकुडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समितीचे सदस्य अरुण हनवते, शाळेचे मुख्याध्यापक आईंचवार व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये ओंकार राखूंडे या विद्यार्थ्याने स्वतः रचलेली कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. वर्ग दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भीमगीतांचे समूह गायन केले, तर काहींनी ओघवत्या शैलीत भाषणे दिली. शाळेच्या अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.
. उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अध्यक्ष अनिल कोकुडे आणि मुख्याध्यापक आईंचवार यांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, असे मार्गदर्शन केले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातव्या वर्गातील विद्यार्थिनी पलक भोयर व तेजस्विनी बावणे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी सातवीचा विद्यार्थी सम्यक जांभूळकर याने सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


