पदवीदान व व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
कौशल्य विकास आणि भाषाप्रभुत्वाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी ‘रोजगार देणारे’ बनण्याचे आवाहन
वरोरा : स्थानिक लोकशिक्षण संस्थेद्वारे संचालित, लोकमान्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीदान व वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आनंदनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे उपस्थित होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या.
विवेकी समाजात शिक्षणाचे महत्त्व
कार्यक्रमाचे उद्घाटन महात्मा ज्योतिबा फुले व सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर स्वागतगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या मार्गदर्शनात डॉ. मृणाल काळे यांनी सांगितले की, “आजच्या काळात सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक आहेत. दोन्ही क्षेत्रांत इंग्रजी भाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर भर देऊन स्वतः उद्योजक किंवा रोजगार देणारे बनावे.”
. अध्यक्षीय भाषणात प्रा. श्रीकांत पाटील यांनी नमूद केले की, समाजाचे आरोग्य हे तिथल्या नागरिकांच्या विवेकशीलतेवर अवलंबून असते आणि हा विवेक केवळ दर्जेदार शिक्षणानेच समृद्ध होतो. डॉ. जयश्री शास्त्री यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या अष्टपैलू विकासासाठी महाविद्यालयातील विविध उपक्रमांत सहभागी होण्याचे आवाहन केले.
गुणवंतांचा गौरव
या सोहळ्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेल्या १२ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार म्हणून निशा विक्रम कौरासे तर उत्कृष्ट स्वयंसेवक (NSS) पुरस्कार शिवानी संदीप पहापळे यांना प्राप्त झाला. यासोबतच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आणि पदवी प्राप्त विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी व प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
यशस्वी आयोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रजनीगंधा खिरटकर, डॉ. श्रीकांत पुरी, डॉ. रवींद्र शेंडे, प्रा. उत्तम देऊळकर आणि प्रा. हिमगौरी देशपांडे यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. श्रीनिवास पिलगुलवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामूहिक ‘वंदे मातरम’ गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


