आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
जिल्हाधिकारी कार्यालयात सूक्ष्म नियोजनाची बैठक
२५ लाखांचा निधी मंजूर
आदिवासी संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा दिसणार संगम
चंद्रपूर : चंद्रपूरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून ‘राजमाता राणी हिराई महोत्सव’ यंदा प्रथमच भव्य स्वरूपात आयोजित केला जात आहे. २० एप्रिल रोजी होणाऱ्या या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘वीस कलमी सभागृहात’ विशेष बैठक पार पडली. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी सर्व यंत्रणांना महोत्सवाच्या सूक्ष्म नियोजनाचे आणि अंमलबजावणीचे कडक निर्देश दिले.
सांस्कृतिक वैभव आणि आधुनिकतेची सांगड
या महोत्सवासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असल्याने तो ऐतिहासिक आणि संस्मरणीय ठरावा, यासाठी आदिवासी परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आ. मुनगंटीवार यांनी भर दिला आहे. राणी हिराई यांच्या गौरवशाली इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
नियोजनासाठी ‘आयोजन समिती’ व तज्ज्ञांचा सहभाग
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ, सरकारी अधिकारी आणि नियुक्त समिती सदस्यांची एक ‘आयोजन समिती’ स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कार्यक्रमाचा ‘मिनिट टू मिनिट’ आराखडा तयार करून स्थळाची पुनर्पहाणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आदिवासी कला-नृत्यांचा अविष्कार
या महोत्सवात आदिवासी कला-नृत्य स्पर्धांचे आयोजन केले जाणार असून, विजेत्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रे दिली जातील. तसेच, राणी हिराई यांच्या जीवनावर आधारित विशेष सादरीकरणे हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहे.
अत्याधुनिक सुविधा आणि जनजागृती
कार्यक्रमाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, स्वच्छता, पार्किंग, ट्रॅफिक नियंत्रण, मोबाईल टॉयलेट आणि वैद्यकीय सुविधांसोबतच ‘कॅन्सर डिटेक्शन व्हॅन’ व रुग्णवाहिका उपलब्ध असेल. आदिवासी योजनांची माहिती देण्यासाठी विशेष काउंटर आणि QR कोडयुक्त माहितीपत्रकांचा वापर करण्याचे अभिनव पाऊल उचलण्यात येणार आहे.
यांची होती उपस्थिती
या बैठकीस जिल्हाधिकारी वसूमना पंत, महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश, उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, डॉ. मंगेश गुलवाडे, राहुल पावडे तसेच नगरसेवक प्रज्वलंत कडू, रवी लोणकर, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नम्रता ठेमस्कर, सुरज पेदुलवार आदी उपस्थित होते. हा महोत्सव आदिवासी समाजाच्या श्रद्धेचा आणि इतिहासाच्या गौरवाचा विषय असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले आहे.


