Home चंद्रपुर जिल्हा विशेष चंद्रपूर जिल्ह्याला 2 एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’

चंद्रपूर जिल्ह्याला 2 एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’

318

गारपिटीसह वादळी वाऱ्याचा इशारा 

1 आणि 3 एप्रिलला ‘येलो अलर्ट’

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या इशाऱ्यानुसार, चंद्रपूर जिल्ह्याला आगामी तीन दिवस तीव्र हवामान बदलाचा सामना करावा लागणार आहे. जिल्ह्यासाठी 1 आणि 3 एप्रिल रोजी ‘येलो अलर्ट’, तर 2 एप्रिल रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ, ताशी 40 ते 50 किमी वेगाने सोसाट्याचा वारा आणि गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रशासनाकडून खबरदारीच्या सूचना
संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याच्या वेळी नागरिकांनी सुरक्षित इमारतीचा आश्रय घ्यावा आणि खिडक्या व दरवाजांपासून दूर राहावे. सखल भाग, अंडरपास किंवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. वादळ व विजांच्या कडकडाटाच्या वेळी मोकळ्या जागेत असल्यास उंच झाडाखाली, लोखंडी वस्तूजवळ किंवा तात्पुरत्या शेडमध्ये थांबू नये. घरात असताना सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा आणि पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे. तसेच, पावसामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने वाहन चालवणे टाळावे आणि विजेच्या तारा व पॉवर लाईन्सपासून सुरक्षित अंतर राखावे.

भाविकांना सतर्कतेचा इशारा
सध्या सुरू असलेल्या महाकाली यात्रेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरून येणाऱ्या भाविकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच आपला प्रवास करावा. यात्रेकरूंनी निवाऱ्याच्या सुविधेबाबत अधिक माहितीसाठी मंदिर परिसरातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

error: Content is protected !!