Home चंद्रपुर जिल्हा विशेष मुधोलीत अवैध दारूचा महापूर

मुधोलीत अवैध दारूचा महापूर

368

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष की अभय ?

युवा पिढी व्यसनाच्या गर्तेत, महिलांचा संताप

ठोस कारवाई न झाल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

भद्रावती : तालुक्यातील मुधोली गावासह परिसरात सध्या अवैध दारू विक्रीने कमालीचा वेग घेतला असून, यामुळे संपूर्ण गाव हादरले आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाचे या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून, केवळ ‘थातुरमातुर’ कारवाई करून बोळवण केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

मुख्य सूत्रधाराचे नाव चर्चेत

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, मुधोली परिसरात प्रणय राऊत नामक व्यक्ती अवैध दारू विक्रीचा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे. हा इसम भद्रावती येथील एका देशी दारूच्या भट्टीतून मोठ्या प्रमाणात साठा आणून तो मुधोली व आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवर वितरित करतो. गावपातळीवर चालणाऱ्या या खुलेआम विक्रीमुळे आता गावातील शांतता धोक्यात आली आहे.

संसाराची होतेय राखरांगोळी

या अवैध धंद्याचा सर्वाधिक फटका गावातील तरुण वर्ग, अल्पभूधारक शेतकरी आणि कष्टकरी कामगारांना बसत आहे. व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंबांतील कमावते पुरुष आपली कष्टाची कमाई दारूवर उधळत आहेत. याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर आणि कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर होत असून, घरोघरी वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

महिलांचा प्रशासनावर प्रहार

गावातील महिलांनी या परिस्थितीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आम्ही वारंवार तक्रारी देऊनही ठोस कारवाई का होत नाही? अवैध दारू विक्रेत्यांना कोणाचे पाठबळ आहे?” असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला आहे. घरातील आर्थिक व सामाजिक संतुलन बिघडल्याने महिला आता थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

निर्णायक आंदोलनाचा इशारा

ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे की, जर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन मुधोलीतील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद केली नाही आणि मुख्य संशयितांवर कठोर गुन्हे दाखल केले नाहीत, तर संपूर्ण गाव एकत्रित येऊन भद्रावती पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढेल आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल.

error: Content is protected !!