रुग्णालयांना जनरेटरसाठी इंधन पुरवा !
आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
आरोग्यसेवा अखंडित ठेवण्यासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी
चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली अत्यावश्यक वैद्यकीय सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे पाऊल उचलले आहे. रुग्णालयांच्या जनरेटरसाठी आवश्यक असणारे डिझेल आणि पेट्रोल विनाअडथळा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
. सध्याच्या परिस्थितीत पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन वितरणावर काही प्रमाणात निर्बंध येत असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर होण्याची दाट शक्यता आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी मांडली आहे.
रुग्णांच्या जीविताचा प्रश्न
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की, वीज पुरवठा खंडित झाल्यास रुग्णालयांमध्ये तात्काळ जनरेटरचा वापर करणे अनिवार्य असते. विशेषतः शस्त्रक्रिया सुरू असताना किंवा अतिदक्षता विभागात (ICU) जीवनरक्षक यंत्रणा चालू ठेवण्यासाठी वीज खंडित होणे परवडणारे नसते. अशा संवेदनशील वेळी जर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आणि जनरेटर बंद पडले, तर रुग्णांच्या उपचारात गंभीर अडथळे निर्माण होऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
प्रशासनाने तातडीने निर्देश देण्याची गरज
आरोग्यसेवा ही अत्यंत संवेदनशील सेवा असल्याने ती विस्कळीत होऊ नये, यासाठी आ. मुनगंटीवार यांनी सुचवले आहे की, जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना त्यांच्या गरजेनुसार इंधन मिळावे. संबंधित रुग्णालयाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे मागणी केल्यानंतर पेट्रोल पंप चालकांनी त्यांना जनरेटरसाठी लागणारे डिझेल आणि पेट्रोल उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने पेट्रोल पंप चालकांना द्यावेत.
. जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये आणि आपत्कालीन स्थितीत आरोग्य यंत्रणा सज्ज राहावी, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.


