इरई व झरपट नदी पुनरुज्जीवनासाठी आमदार मुनगंटीवार यांची ठाम मागणी
नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या पहिल्याच प्रस्तावात चंद्रपूरच्या नद्यांचा अग्रक्रमाने समावेश करणार
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे आश्वासन
चंद्रपूर : “चंद्रपूर शहरातील जीवनदायिनी इरई व झरपट या नद्यांचे तातडीने पुनरुज्जीवन करून त्या स्वच्छ व अविरत वाहत्या कराव्यात,” अशी ठाम व आग्रही मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेदरम्यान मांडली. सनातन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात पंचमहाभूतांना दैवत मानले जाते आणि नद्यांना ‘माता’ म्हणून पूजले जाते. मात्र आधुनिकतेच्या अतिरेकामुळे नद्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण झाले असून त्या प्रदूषणाच्या गंभीर विळख्यात अडकल्या आहेत. संस्कारित प्रगतीऐवजी स्वैराचाराकडे वाढणाऱ्या प्रवृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
. सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत असताना दि. ३० सप्टेंबर २०२२ रोजी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “चला जाणूया नदीला” हा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता. नद्यांना सजीव घटक मानून त्यांच्या स्वच्छता, संवर्धन व प्रदूषणमुक्तीसाठी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाला पर्यावरण विभागामार्फत अधिक व्यापक स्वरूप देण्यात यावे व हा उपक्रम पुढे न्यावा अशी मागणीही आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी केली.
. चंद्रपूर शहरातील इरई नदी व झरपट नदी या नद्या शहराच्या जीवनवाहिन्या मानल्या जातात. मात्र वाढते औद्योगिक सांडपाणी, अस्वच्छता व अतिक्रमणांमुळे या नद्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून कॅन्सर व त्वचारोगांसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या नद्यांचे तातडीने पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. सध्या चैत्र महिन्यात माता महाकालीची यात्रा सु्रू असून झरपट नदी त्याच परिसरात आहे. विशेषत: मराठवाडयातुन मोठया प्रमाणावर भाविक या यात्रेत सहभागी होतात असे सांगत या झरपट नदीचे धार्मिक महत्व त्यांनी अधोरेखित केले.
. या नद्या पुनरुज्जीवीत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे ५००० कोटी रुपयांच्या निधीपैकी किमान २०० कोटी रुपये चंद्रपूरातील या दोन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी खर्च करण्यात यावेत, अशी ठोस मागणी आमदार मुनगंटीवार यांनी केली. तसेच दोन्ही नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी सविस्तर आराखडा तयार करणे, नदीपात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटविणे, व्यापक जनजागृती अभियान राबविणे आणि योग्य सांडपाणी व्यवस्थापन व औद्योगिक प्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवणे,नदी काठ सुशोभीत करणे या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशीही त्यांनी मागणी केली. या माध्यमातून दोन्ही नद्या स्वच्छ, अविरत आणि शुद्ध पाण्यासह वाहत्या ठेवण्याचा संकल्प पूर्ण करून चंद्रपूरकरांना मोठा दिलासा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यात नदी पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. नद्यांकडे झालेले दुर्लक्ष अक्षम्य असल्याची कबुली देत त्या प्रदूषणमुक्त व स्वच्छ करण्याची जबाबदारी शासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर तयार होणाऱ्या पहिल्याच प्रस्तावात चंद्रपूर येथील इरई व झरपट नद्यांचा अग्रक्रमाने समावेश करण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या “चला जाणूया नदीला” या उपक्रमाला पर्यावरण विभागामार्फत पुढे नेण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
. या आश्वासनामुळे चंद्रपूरच्या पर्यावरण संवर्धनासाठी नवी आशा निर्माण झाली असून नागरिकांना स्वच्छ व निरोगी भवितव्याचा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.


