Home सामाजिक चंद्रपुरात जिल्हा उद्योजक व रोजगार मेळावा उत्साहात

चंद्रपुरात जिल्हा उद्योजक व रोजगार मेळावा उत्साहात

133

तरुणांनी स्वयंरोजगाराच्या संधी ओळखाव्या

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांचे आवाहन

चंद्रपूर : येथील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अन्ड आर्टसमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पुणे येथील ‘दे-आसरा फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा उद्योजक मेळावा तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २०० उमेदवारांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

.     कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून दे-आसरा फाऊंडेशनच्या व्यावसायिक समुपदेशक योगिता कस्तुरे, बिझनेस ग्रोथ स्ट्रॅटजिस्ट डॉ. रवींद्र अहेर आणि कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांची उपस्थिती होती.

सूक्ष्म व लघु उद्योगांवर भर
मार्गदर्शक डॉ. रवींद्र अहेर यांनी सूक्ष्म, लघुउद्योग व पारंपरिक कारागिरांना त्यांच्या व्यवसायाच्या सर्व पैलूंमध्ये उत्कृष्टता कशी प्राप्त करता येईल, यावर सविस्तर भाष्य केले. उद्योजकांनी एकमेकांशी ओळखी वाढवून नेटवर्किंगद्वारे व्यवसाय कसा वृद्धिंगत करावा, याचे तंत्रही त्यांनी सांगितले. योगिता कस्तुरे यांनी दे-आसरा फाऊंडेशनच्या कामकाजाची माहिती देत नवीन उद्योजकांना मिळणाऱ्या मदतीबाबत मार्गदर्शन केले.

तणावमुक्ती आणि व्यवसायाचे नियोजन
उद्योग करताना येणाऱ्या मानसिक तणावावर नियंत्रण कसे मिळवावे, यावर अमर नायसे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी या मेळाव्याची गरज स्पष्ट केली. “उद्योजक मेळावा ही एक मोठी संधी असून, व्यवसाय कसा सुरू करावा याचे मार्गदर्शन घेण्यासाठी तरुणांनी पुढे यावे,” असे आवाहन त्यांनी केले.

.      या मेळाव्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना एकाच छताखाली रोजगार आणि स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!