५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक
वरोरा पोलिसांची धडक कारवाई
वरोरा : वरोरा शहरात मागील काही दिवसांपासून वाढलेल्या दुचाकी चोरीच्या घटनांनी नागरिक त्रस्त होते. या घटनांना आळा घालण्यासाठी वरोरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. आरोपीकडून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
काय आहे नेमकी घटना ?
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ मार्च २०२६ रोजी वरोरा तालुक्यातील बोरगाव येथील रहिवासी रवींद्र शंकर नन्नावरे हे काही कामासाठी वरोरा तहसील कार्यालयात आले होते. त्यांनी आपली पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH 31 BY 7709) कार्यालयासमोर उभी केली होती. मात्र, काही वेळातच अज्ञात चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. याप्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी तातडीने कलम ३०२ (२) बी. एन. एस. अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
असा लागला चोरट्याचा सुगावा
घटनेचे गांभीर्य ओळखून ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी केली. गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित गिरीश बापूराव ठाकरे (४३, रा. इंदिरानगर बोर्डा) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच आपला गुन्हा कबूल केला.
दोन गुन्ह्यांची उकल
पोलिसांनी आरोपीकडून नन्नावरे यांची २५ हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी एका गुन्ह्यातील (क्र. ४०९/२०२६) ३० हजार रुपये किमतीची दुसरी मोटारसायकल (क्र. MH 34 AR 3465) देखील चोरल्याची कबुली दिली. अशा प्रकारे पोलिसांनी एकूण ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार ओमप्रकाश सोनटक्के, सपोनी शरद भस्मे, सुकराज यादव, पोहवा नवघरे, संदीप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे आणि सौरभ कुलथे यांनी पार पाडली. वरोरा पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरट्यांच्या टोळीत मोठी खळबळ उडाली आहे.


