Home सामाजिक महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र ‘योग आयोग’ आणि ‘आयुष मंत्रालय’ स्थापन होणार

महाराष्ट्रात लवकरच स्वतंत्र ‘योग आयोग’ आणि ‘आयुष मंत्रालय’ स्थापन होणार

158

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला सरकारचे सकारात्मक उत्तर

आमदार मुनगंटीवार यांची विधानसभेत जोरदार मागणी

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे लवकरच निर्णयाचे आश्वासन

चंद्रपुर : महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र योग आयोगाची तातडीने स्थापना करावी, अशी  जोरदार मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. योग हा भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून त्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे २१ जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. विशेष म्हणजे तब्बल १७७ देशांनी या उपक्रमास मान्यता दिली आहे.

.      आमदार मुनगंटीवार यांनी या संदर्भात बोलताना नमूद केले की, देशातील मध्यप्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड व राजस्थान या राज्यांमध्ये योग आयोग स्थापन करण्यात आले आहेत; मात्र महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात अद्याप अशी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. २७ जानेवारी २०२५ रोजी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात निवेदन सादर केले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते; मात्र वर्षभर उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, याकडे मुनगंटीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. याबाबतच्या नस्तीच्या लालफीतशाहीचा प्रवासच त्यांनी सभागृहासमोर मांडला.

  “पंतप्रधानांनी योगाचा विषय जागतिक स्तरावर नेला, मात्र महाराष्ट्रात याबाबत उदासीनता का ?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यात योगाच्या प्रसारासाठी, प्रशिक्षणासाठी, संशोधनासाठी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीला चालना देण्यासाठी स्वतंत्र योग आयोग अत्यावश्यक असल्याचे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. तसेच आठ दिवसांच्या आत या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी ठोस मागणीही त्यांनी केली.

.      या चर्चेला उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, गुजरात व राजस्थानच्या धर्तीवर महाराष्ट्रातही योग आयोग स्थापन करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. सदर प्रकरण सध्या विधी व न्याय विभागाकडे विचाराधीन आहे. यासोबतच राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.लवकरच महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करण्यात येईल तसेच आयुष मंत्रालय देखील अस्तित्वात येईल, असे ठोस आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिले.

.     योगाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या भारतात आणि प्रगत महाराष्ट्रात योग क्षेत्रासाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा उभी राहणार असल्याने राज्यातील योगप्रेमी, प्रशिक्षक व आरोग्य क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!