Home सामाजिक चंद्रपूरचा डंका जगात ! एकाच महिन्यात दुसऱ्या विश्वविक्रमाची तयारी

चंद्रपूरचा डंका जगात ! एकाच महिन्यात दुसऱ्या विश्वविक्रमाची तयारी

140

१८० देशांचे लक्ष आता चंद्रपूरकडे

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी सोमय्या ग्रुप सज्ज

हजारो विद्यार्थी साकारणार जगातील सर्वात मोठे मानवी शांतता चिन्ह

चंद्रपूर : जगभरात सध्या युद्धजन्य परिस्थिती, वाढती महागाई आणि राजकीय अस्थिरतेचे सावट असताना, “युद्ध नको, तर शांती हवी” असा वैश्विक संदेश देण्यासाठी चंद्रपूर सज्ज झाले आहे. येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सच्या वतीने येत्या शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी एक अभूतपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला आहे. वडगाव येथील सोमय्या कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून जगातील सर्वात मोठे मानवी ‘जागतिक शांतता चिन्ह’ (International Peace Symbol) साकारले जाणार आहे.

१८० देशांमध्ये थेट प्रक्षेपण
या उपक्रमाचे गांभीर्य आणि भव्यता लक्षात घेता, याचे थेट प्रक्षेपण जगातील सुमारे १८० देशांमध्ये केले जाणार आहे. यामुळे चंद्रपूर शहराचे नाव जागतिक नकाशावर अभिमानाने झळकणार आहे. विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांसारख्या राष्ट्रांमधील वाढता तणाव आणि संभाव्य तिसऱ्या महायुद्धाच्या भीतीने जग ग्रासलेले असताना, चंद्रपूरचे तरुण विद्यार्थी शांततेचा हा प्रभावी संदेश जगाला देणार आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद
या ऐतिहासिक क्षणाची अधिकृत नोंद ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यासाठी संस्थेने पूर्ण तयारी केली आहे. या मानवी साखळीची रचना आणि शिस्त तपासण्यासाठी तज्ज्ञांची चमू उपस्थित राहणार आहे. हा केवळ एक विक्रम नसून मानवतेसाठी दिलेली एक हाक असल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे.

एकाच महिन्यात दुसरा विश्वविक्रम !
सोमय्या ग्रुपसाठी हा महिना विक्रमी ठरत आहे. याच महिन्याच्या सुरुवातीला, १ मार्च २०२६ रोजी सोमय्या संस्था आणि उत्कृष्ट महिला मंच यांनी २७०० महिला व विद्यार्थिनींच्या माध्यमातून अवघ्या ७ मिनिटांत २० लावण्यांचे सादरीकरण करून पहिला जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता महिना संपण्यापूर्वीच हा दुसरा मोठा विक्रम करून सोमय्या ग्रुप नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

“हा उपक्रम केवळ एक विक्रम नसून, ती मानवतेची एकता आणि सहअस्तित्वाची हाक आहे. चंद्रपुरातून जाणारा हा शांततेचा संदेश संपूर्ण जगाला प्रेरणा देईल.”                                                                                                                                                                                                            पी. एस. आंबटकर, (अध्यक्ष, सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स)

error: Content is protected !!